थरारक ! लासूर स्टेशन येथे बाळासह आई व महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 07:07 PM2017-12-11T19:07:29+5:302017-12-11T19:08:29+5:30
बाळासह दोन महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री लासूर स्टेशन येथे घडली. ही प्रत्यक्ष घटना पाहणा-यांचा काळजाचा थरकाप उडाला. ‘नशीब बलवत्तर’ म्हणूनच या दोन्ही महिला आणि बाळ बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले.
औरंगाबाद : बाळासह दोन महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री लासूर स्टेशन येथे घडली. ही प्रत्यक्ष घटना पाहणा-यांचा काळजाचा थरकाप उडाला. ‘नशीब बलवत्तर’ म्हणूनच या दोन्ही महिला आणि बाळ बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस रविवारी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास रवाना झाली. ही रेल्वे रात्री १०.५५ वाजता लासूर स्टेशनवर पोहोचली. लासुर स्टेशन परिसरामध्ये कापूस वेचनीसाठी खंडवा (मध्यप्रदेश) येथील बरेच महिला-पुरुष कामगार आलेले आहेत. यातील काही कामगार या नंदीग्राम एक्स्प्रेसने मनमाडमार्गे खंडवा येथे जाण्यासाठी आले होते. काही वेळेनंतर येथून नंदीग्राम एक्स्प्रेस सुटली. खांडवा येथील चार महिला चार पुरूष दोनबाळांसह बोगी क्रमांक एस : ६-७ मध्ये जात होते. यावेळी एक महिला एक, एक पुरुष बोगीत गेले. परंतु इतरांना सोबत असलेल्या अधिक साहित्यामुळे चढताच आले नाही.
याच वेळी दोन महिलांनी चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एक महिला तोल जाऊन पडली. तिला मदत करण्याचा प्रयत्न करताना आणखी एक महिला बाळासह खाली पडली. हे तिघेही प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्यामध्ये सापडण्याच्या स्थितीत असताना ही बाब लासूर येथील रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना ओढून बाजूला केले. हे दृश्य पाहून नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये बसलेले अन्य महिला व पुरुष हे धावत्या रेल्वेतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना इतरांनी वेळीच रोखले. या घटनेत बालंबाल बचावल्याने सदर महिला घाबरून गेल्या. खाली पडल्याने जखमीही झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून देवगिरी एक्सप्रेसने त्यांना रवाना करण्यात आले. यासाठी लासूर स्टेशन व्यवस्थापक गुप्ता, पॉइंट्समन यादव यांनी मदत केली.