थरारक ! आवडत्या मुलीचे लग्न ठरले, संतापून तरुणाने भावी नवरदेवाच्या हॉटेलवर केला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:08 PM2021-03-31T16:08:59+5:302021-03-31T16:11:18+5:30
Firing at Pagegaon पडेगांव येथील रामगोपालनगरातील रात्री ३ वाजेची घटना
औरंगाबाद: आपल्याला नाकारणाऱ्या मुलीसोबत तुम्ही लग्न करू नका, यासाठी चक्क नियोजित नवरदेवाच्या घरात धमकीचे पत्र टाकून दोन जणांनी हॉटेलवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पडेगांवातील रामगोपालनगरात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली.
विशाल मनोहर गाडीलकर (रा. कोपर्डी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. यावेळी त्याच्यासोबत अन्य एक जण होता. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार मनिष किसनराव गायकवाड या तरुणाचे पडेगांव येथे हॉटेल मनिष इन हे हॉटेल आणि लॉजिंग आहे. या हॉटेलच्या मागे तो आईवडिल आणि बहिण यांच्यासोबत राहतो. मनिषचे दोन महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील मुलीसोबत लग्न ठरले आहे. २५ एप्रिल रोजी त्यांचा विवाह होणार आहे. मनिषचे लग्न जमण्यापूर्वी संशयित आरोपी विशालने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिच्या आईवडिलांनी त्यास नकार दिला होता.
दरम्यान, तीचे मनिषसोबत लग्न जमल्याची माहिती मिळताच विशाल आणि त्याच्या नातेवाईकांनी आपल्याला नाकारणाऱ्या मुलीच्या कुटुंबासोबत तुम्ही सोयरीक करु नका असा आग्रह गायकवाड कुटुंबाकडे धरला. मात्र, गायकवाड कुटुंबीयांनी त्यास नकार देत लग्नाची तारीख काढली. यानंतर विशालने मनीषच्या वडिलांना व्हॉटसॲपवर, 'त्या मुलीचा विचार सोडा' असा मेसेज केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून गायकवाड कुटुंबाने लग्नाची तयारी सुरु केली.
३० मार्च रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे गायकवाड कुटुंब झोपले. रात्रपाळीचा हॉटेलचा मॅनेजर शेख मुजफ्फर स्वागत कक्षातील सोफ्यावर झोपला होता. पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने तो झोपेतून उठला. यावेळी त्याच्या ब्लॅंकेटवर काचा पडलेल्या दिसल्या. शिवाय स्वागत कक्षाच्या काचेवर छिद्र पडलेले आणि काचेला तडे गेल्याचे दिसले. कोणीतरी दगड मारला असेल असे समजून त्याने शेजारीच राहणाऱ्या मनिषला आवाज देऊन उठवले.
पोलीस आयुक्तासह अन्य अधिकारी घटनास्थळी
या घटनेची माहिती मनिष यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, मनोज पगारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ, पी. एस. भागिले आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.