थरारक ! चाकूच्या धाकावर लुटल्याने धावत्या रिक्षातून प्रवास्याने उडी घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 07:04 PM2021-09-06T19:04:27+5:302021-09-06T19:08:05+5:30

शेंद्र्याकडे जाणाऱ्या रिक्षात बसल्यानंतर प्रवाशाला लुटले

Thrilling! The passenger jumped out of the speeding rickshaw after being robbed at knife point | थरारक ! चाकूच्या धाकावर लुटल्याने धावत्या रिक्षातून प्रवास्याने उडी घेतली

थरारक ! चाकूच्या धाकावर लुटल्याने धावत्या रिक्षातून प्रवास्याने उडी घेतली

googlenewsNext
ठळक मुद्देजुन्या बीड बायपास रोडवरील घटना एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद : एका खासगी कंपनीमध्ये नोकरी असलेला युवक शेंद्रा येथील घरी जाण्यासाठी चिकलठाणा येथून रिक्षात बसला. चालकासह इतर दोघांनी रिक्षा शेंद्र्याकडे घेऊन जाण्याऐवजी जुना जालना नाका येथून जुन्या बीड बायपास रस्त्याने नेली. रेल्वे गेटच्या थोड्या अंतरावर रिक्षा गेल्यानंतर मध्यभागी बसलेल्या प्रवासी युवकाला लुटल्याचा प्रकार शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार ट्रान्स एशिया बायोमेडिकल लिमिटेड कंपनीत नोकरीत असलेला युवक विवेक रामशब्द विश्वकर्मा (वय २९, रा. शेंद्रा, कमंगर, ता. औरंगाबाद) हा जळगाव येथून कंपनीचे काम आटोपून शनिवारी रात्री ११ च्या सुमारास औरंगाबादेत पोहोचला. सिडको बसस्थानक परिसरातून रिक्षाने चिकलठाणापर्यंत आला. तेथून केंब्रिज चौकापर्यंत जाण्यासाठी एका रिक्षात बसला. या रिक्षात अगोदरच दोन प्रवासी बसले होते. त्यातील एकाने लवकर उतरायचे असल्यामुळे विवेक यास मध्यभागी बसण्यास सांगतिले. तीन प्रवासी झाल्यानंतर चालकाने रिक्षा केंब्रिज चौकाच्या दिशेने काही अंतर नेली. त्यानंतर पुढे जाण्याऐवजी जुना जालना नाका येथून जुन्या बीड बायपास रस्त्याकडे रिक्षा नेली. तेव्हा विवेकने रिक्षा कोठे घेऊन जात आहेत, असे विचारले असता चालकाने एका प्रवाशाला पुढे सोडायचे असल्यामुळे या रस्त्याने आल्याचे सांगितले. रिक्षा शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने रेल्वेगेटच्या पुढे गेल्यानंतर निर्जन स्थळ येताच पाठीमागे बसलेल्या एका प्रवाशाने खिशातून चाकू काढला. दुसऱ्याने विवेकच्या खिशातील मोबाईल हिसकावला. जवळ असलेले ७०० रुपयेही काढून घेतले. या झटापटीत दोन प्रवाशांनी विवेकला मारहाणही केली. विवेकने चालत्या रिक्षातून उडी मारून सुटका करून घेतली.

ही घटना रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर परिसरातील रहिवासी बाबासाहेब दहिहंडे यांनी लुटलेल्या युवकाला मदत करीत जालना रोडपर्यंत आणले. त्यानंतर गस्तीवर असलेल्या एका पोलिसांच्या गाडीत बसवून त्याला केंब्रिज चौकापर्यंत पाठविले. केंब्रिज चौकात लुटलेल्या युवकाचे वडील घेण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत युवक घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी एमआयडीसी चिकलठाणा पोलीस ठाण्यात येत फिर्याद दिली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक डी. पी. सोनवणे करीत आहेत.

Web Title: Thrilling! The passenger jumped out of the speeding rickshaw after being robbed at knife point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.