थरार! तहसिलदार, तलाठ्यांची माफियांसोबत झटापट; जीवघेणा हल्ल्यातून कसेबसे बचावले

By विकास राऊत | Published: December 27, 2023 07:26 PM2023-12-27T19:26:11+5:302023-12-27T19:28:38+5:30

गौण खनिजची चोरटी वाहतुक पकडतांना थरार; तहसिलदार, तलाठ्यांसाेबत माफियांची झटापट

Thrilling! Tehsildar, Talathi surrounded by sand mafia; How did you survive the fatal attack? | थरार! तहसिलदार, तलाठ्यांची माफियांसोबत झटापट; जीवघेणा हल्ल्यातून कसेबसे बचावले

थरार! तहसिलदार, तलाठ्यांची माफियांसोबत झटापट; जीवघेणा हल्ल्यातून कसेबसे बचावले

 

छत्रपती संभाजीनगर : सिंधेान-भिंदोन, शिवगड तांडा, सहस्त्रमुळी, गांधेली परिसरातून बुधवारी सकाळी गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या माफियांनी महसूलच्या पथकाला घेरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दीड तास पाठलागाचा खेळ सुरू होता. माफियांच्या कचाट्यातून महसूलचे पथक कसेबसे बचावले.

चोरटी वाहतूक सुरू असल्याच्या माहितीचा फाेन खणखणतच चार ते पाच तलाठ्यांसह तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी सकाळी ९:४५ वाजता घटनास्थळ गाठले. तहसीलदारांच्या आदेशाने तलाठ्यांनी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांना हायवाला रोखले. हायवात तलाठी बसताच, चालकांनी वेगाने विनाक्रमांकाचा हायवा पळवून तलाठ्याला मारहाण करून खाली ढकलले. हायवा थांबविल्यानंतर हायवा चालकाच्या इतर साथीदारांनी महसूल पथकास घेरले. त्यात तहसीलदारांसह तलाठ्यांसाेबत माफियांची झटापट झाली. तलाठी अशोक काशीद यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात भादंवि ३५३, ३७९, ३३२, १०९, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला.

चालकाने वाहन थांबविलेच नाही

हायवा पकडल्यानंतर तलाठी ज्ञानेश्वर सोनवणे, रवी लोखंडे आत बसले. तलाठी बसताच चालकाने वेगाने हायवा पळविला. वेगाने हायवा का पळवितो, फोन कुणाला करतोय असे तलाठ्यांनी विचारताच, चालक व तलाठ्यांमध्ये बाचाबाची झाली. सोलापूर-धुळे हायवेपर्यंत हायवा पळविला. त्यात माफियाचा आणखी एक साथीदार बसला. उतरा नाही तर हायवा तुमच्या बाजूने खड्ड्यात घालीन, अशी धमकी देत तलाठ्यांना मारहाण करून खाली ढकलले.

गोळीबार केल्याची चर्चा

शिवगडतांडा परिसरात तहसीलदारांनी माफियांवर गोळीबार केल्याची चर्चा पसरली. याबाबत तहसीलदार म्हणाले, रिव्हॉल्व्हर घरीच होते. माफियामध्ये आणि पथकामध्ये झटापट झाली. माझा मोबाईल माफियांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

शिवीगाळ आणि धक्काबुक्की

तलाठी काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, सकाळी देवळाई, कचनेर, सहस्त्रमुळी भागात विनाक्रमांकाचा हायवा मुरूमाने भरून चालला होता. त्याला तहसीलदारांनी थांबवून परवाना आहे काय, अशी विचारणा केली. परंतु, त्याने उत्तर दिले नाही. इसाक शेख, चाँद शेख, सलीम शेख, अब्दुल पटेल, आरेफ पटेल, चांद पटेल, सद्दाम शेख, शेख अक्रम, शेख जुलानी, अलीयार खान यांनी मुंदलोड, तलाठी राजेंद्र भांड, सतीश घुगे, विश्वनाथ गांगुर्डे, सोनवणे, लोखंडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

Web Title: Thrilling! Tehsildar, Talathi surrounded by sand mafia; How did you survive the fatal attack?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.