Video:ओव्हरटेकने ४५ प्रवाशांचा जीव टांगणीला; बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने बस पेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:10 PM2022-03-25T18:10:26+5:302022-03-25T18:12:05+5:30
बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि पुढील अनर्थ टळला
वैजापूर ( औरंगाबाद ) : कन्नड येथून वैजापूरकडे जाणाऱ्या एसटी बसखाली बाईक आल्याने झालेल्या स्फोटात भीषण आग लागल्याची थरारक घटना आज दुपारी ४.३० वाजता वैजापूरजवळ रोटेगाव पुलावर घडली. यात बाईकस्वार संजय नारायण पवार ( ४० , कन्नड, वडारवाडा) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. तर बसमधील सर्व ४५ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कन्नड आगारातून वैजापूरसाठी एक बस दुपारी रवाना झाली. तर याच दरम्यान आन्दूरसोल या येवला तालुक्यातील लग्न आटपून संजय पवार कन्नड येथे परतत होते. दरम्यान, वैजापूरजवळील रोटेगाव पुलावर ४.३० वाजेच्या सुमारास ओव्हरटेकच्या प्रयत्नात पवार यांची बाईक बसच्या समोरच्या चाकाखाली आली. अचानक भरधाव बाईकखाली समोरच्या चाकाखाली अडकल्याने चालकाने ब्रेक दाबले. मात्र, बाईक चाकाखाली फरफटत गेल्याने पेट्रोल टाकी फुटून मोठा स्फोट झाला. त्यामुळे बाईक आणि बसच्या समोरच्या बाजूला आग लागली.
वैजापूरजवळ रोटेगाव पुलावर अपघातात बाईकचा स्फोट, बस जाळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप #accidental#aurangabadpic.twitter.com/yxKcolfFkU
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) March 25, 2022
दरम्यान, बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबली. प्रवाश्यांना माहिती देत चालकाने लागलीच बस रिकामी केली. क्षणार्धात बस आणि बाईक आगीच्या वेढ्यात येऊन खाक झाली. बाईकस्वार संजय पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. या थरारक घटनेमुळे रोटेगाव पुलावर काहीकाळ वाहनकोंडी झाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाने अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. बसमधील सर्व ४५ प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला.