सौराष्ट्रचा महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:25 AM2018-01-09T00:25:01+5:302018-01-09T00:25:13+5:30
गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सौराष्ट्रने आज येथे पश्चिम विभागीय सय्यद मुश्ताक अली टी २0 साखळी फेरीच्या रोमहर्षक लढतीत महाराष्ट्रावर ४ धावांनी निसटता विजय मिळवला.
राजकोट : गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सौराष्ट्रने आज येथे पश्चिम विभागीय सय्यद मुश्ताक अली टी २0 साखळी फेरीच्या रोमहर्षक लढतीत महाराष्ट्रावर ४ धावांनी निसटता विजय मिळवला.
सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा संघ ७ बाद १३८ धावाच करू शकला.
सलामीच्या सामन्यात गुजरातवर विजय मिळवणाºया महाराष्ट्राला या सामन्यात ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांनी शानदार सुरुवात करून देताना ७.४ षटकांत ६0 धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाडने २७ चेंडूंत ४१ व राहुल त्रिपाठीने २0 धावा केल्या. युवा लेगस्पिनर युवराज चुडासमा याने त्रिपाठीला बाद करीत महाराष्ट्राला पहिला धक्का दिला. त्यानंतर त्यांचा डाव ढेपाळला. १0 व्या षटकात गायकवाडही तंबूत परतला. अंकित बावणे, नौशाद शेख व निखिल नाईकही स्वस्तात तंबूत परतले. अखेरच्या षटकात महाराष्ट्राला विजयासाठी १२ धावांची गरज होती; परंतु या षटकात पहिल्या आणि अखेरच्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्याने संघ विजयी लक्ष्य प्राप्त करू शकला नाही. सौराष्ट्रकडून शौर्य सनांदिया व चुडासामा यांनी अनुक्रमे ३७ व २६ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्याआधी नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करणाºया सौराष्ट्रची सुरुवात चांगली झाली नाही. सहा षटकांत त्यांच्या ३ बाद ४0 धावा होत्या. त्यानंतर विश्वराजसिंह जडेजा (१७) व प्रेरक मांकड (३४) यांनी ३४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. जयदेव उनाडकटने १८ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून डोमनिक मुथ्थूस्वामी, श्रीकांत मुंडे, जगदीश झोपे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी प्रत्येकी २७ धावा मोजल्या.
संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र : २0 षटकांत ९ बाद १४२. (पारेक मांकड ३४, जयदेव उनाडकट १८, विश्वराजसिंह जडेजा १७, रॉबिन उथप्पा १२. श्रीकांत मुंडे २/२७, डोमेनिक मुथ्थूस्वामी २/२७, जगदीश झोपे २/२७).
महाराष्ट्र : २0 षटकांत ७ बाद १३८. (ऋतुराज गायकवाड ४१, राहुल त्रिपाठी २0, नौशाद शेख २४, निखिल नाईक १८, अंकित बावणे १२, श्रीकांत मुंडे १0. चुडासामा युवराज २/२६, शौर्य सनांदिया २/३७).