माझी रक्षा शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा; शिक्षकाने मृत्यूनंतरही दिली अनमोल शिकवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:46 PM2021-05-15T16:46:46+5:302021-05-15T20:09:59+5:30
हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते.
केऱ्हाळा : माझा मृत्यू झाला तर, माझी रक्षा नदीच्या पाण्यात टाकून प्रदूषण न करता आपल्या शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा, अशी शेवटची इच्छा केऱ्हाळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमंतराव देवराव पांढरे यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी ही इच्छा पूर्ण केली असून, शेतात रक्षा विसर्जित करून त्यावर पाच झाडे लावण्यात आली आहेत.
हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते. हनुमंतराव यांचे ९ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तीन दिवसांनंतर त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक जमा झाले होते. अनेकांनी त्यांची रक्षा एखाद्या पवित्र स्थानी नदीत विसर्जित करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या मुलांनी वडिलांनी जिवंतपणी व्यक्त केलेली शेवटची इच्छा नातेवाइकांना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी ही रक्षा स्वत:च्या शेतात विसर्जित करून त्यावर पाच वृक्ष लावले. उपस्थित अनेक नातेवाइकांनी या उपक्रमाची स्तुती केली.
सिल्लोड तालुक्यातील संस्कृतचे पहिले पीएच.डी.
दिवंगत हनुमंतराव पांढरे हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांनी १९७६ ला एमए, एमएड पूर्ण केले. १९७७-७९ ला संस्कृतमध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळविली. सिल्लोड तालुक्यातून संस्कृतमध्ये पीएच.डी. मिळविणारे ते पहिले व्यक्ती ठरले. त्यानंतर ते माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पहिले मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच कुस्तीची मैदानेही गाजविले होती. सलग पाच-पाच तास पोहण्याची त्यांची ख्याती होती. त्यांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.