खोडसाळपणाने ‘एटीएम’वर घातले दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:54 AM2017-09-23T00:54:35+5:302017-09-23T00:54:35+5:30
गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील समर्थनगर येथील दोन वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशीनवर एक जणाने दगड घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एखाद्याच्या मनात आले की, कोण काय करील, हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील समर्थनगर येथील दोन वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशीनवर एक जणाने दगड घातले. यात दोन्ही मशीनच्या स्क्रीन फुटल्याने त्यांचे कामकाज ठप्प झाले.
याविषयी अधिक माहिती देताना क्र ांतीचौक ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे म्हणाले की, समर्थनगर येथील मुख्य रस्त्यावर विविध बँकांचे एटीएम सेंटर आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा ते १ वाजेच्या सुमारास भारतीय स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर एक जणाने हल्लाबोल केला. समर्थनगर परिसरात राहणाºया गोमटे नावाच्या सुमारे ५५ वर्षीय व्यक्तीने रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरवर चक्कर मारली. यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास पुन्हा तेथे गेला आणि एटीएम मशीनवर त्याने भलामोठा दगड घातला. या घटनेत एटीएमची स्क्रीन खराब झाली आणि घटनेपासून एटीएमचे कामकाज ठप्प झाले.
विशेष म्हणजे तो रस्त्यावरून दगड घेऊन एटीएम सेंटरमध्ये गेल्याचे तेथील सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. तत्पूर्वी १२.३० वाजेच्या सुमारास याच गोमटे नावाच्या व्यक्तीने भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएम सेंटरवर धाव घेतली. प्रथम त्याने सीडीएमवर (पैसे जमा करण्याचे मशीन) वीट मारली. मात्र, या मशीनची स्क्रीन मजबूत असल्याने स्क्रीनला काहीच झाले नाही. यामुळे त्याने दुसरी वीट शेजारी असलेल्या एटीएम मशीनवर घातली. यात मात्र मशीनचे नुकसान झाले. त्याचे हे कृत्यही सीसीटीव्हीत कैद झाले. बँक व्यवस्थापक संतोष वर्तक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.