औरंगाबादकरांना भरतेय गुलाबी थंडीची हुडहुडी, तापमानाचा पारा उतरणीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 10:19 PM2017-12-01T22:19:37+5:302017-12-01T22:19:55+5:30
औरंगाबाद : असह्य उन्हाळाचा चटका आणि बहुतांश पावसाळ्यातही गरमीने हैराण राहिलेल्या औरंगाबादकरांसाठी यंदाचा हिवाळा दिलासा देणारा ठरत आहे.
औरंगाबाद : असह्य उन्हाळाचा चटका आणि बहुतांश पावसाळ्यातही गरमीने हैराण राहिलेल्या औरंगाबादकरांसाठी यंदाचा हिवाळा दिलासा देणारा ठरत आहे. शहराचा पारा दिवसागणिक हळूहळू घसरत असून, डिसेंबर महिना चांगलाच हुडहुडी भरविणारा ठरणार आहे. शहराचे तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले असून, पहाटेच्या वेळी थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवत आहे.
दिवाळीनंतर तापमानात घट होण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस जेमतेम थंडीचा सामाना करावा लागला. ११ नोव्हेंबर रोजी शहराच्या तापमानाने १३ अंश सेल्सिअस ही नीच्चांकी गाठली. पारा असाच कमी होत जाणार, अशी अपेक्षा असताना मात्र १२ नोव्हेंबरपासून तापमानात वाढ दिसून आली. वातावरणात अचानक आलेल्या बदलामुळे ऐन थंडीत गरमी अनुभवयाला मिळाली. औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात सरासरी १५ अंश सेल्सिअस ताममान असते. मात्र, २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान पारा २१ अंशापर्यंत पोहोचला.
त्यामुळे हिवाळ्याची चाहूल लागताच अनेकांनी कपाटातून बाहेर काढलेले उबदार कपडे पुन्हा पेटीत ठेवावे लागले. मात्र, २४ तारखेपासून थंडी वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली. १ डिसेंबर रोजी शहरात चिकलठाणा वेधशाळेने १४.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांत शहराचा पारा १४-१५ अंशांच्या आसपास खेळत राहणार आहे. ज्याप्रमाणे मान्सून काळात शेवटी-शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्याप्रमाणे पुढील दोन महिन्यांत कडाक्याची थंडी पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात तापमान दहा अंशाच्या खाली उतरण्याचा अंदाज आहे. वाढलेल्या थंडीमुळे मलेरिया, खोकला, सर्दी, पडसे, ताप, तसेच घशांच्या आजारांपासून बचाव होण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
आला थंडीचा महिना...
थंडीचा तडाखा जाणवू लागल्याने रात्री रस्त्यांवरील गर्दीदेखील कमी झाली आहे. नागरिक घरातील उबदार वातावरणात राहणे पसंत करीत आहेत. रस्त्याच्या कडेला शेकोट्याही पेटलेल्या असून, सकाळी सकाळी गोड गुलाबी थंडीच्या प्रसन्न वातावरणात कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी लोक आतुर दिसत आहेत. लहान मुलांच्या आरोग्यावर थंडीच परिणाम होऊ नये म्हणून पालक मुलांना उबदार कपडे घालूच शाळेत पाठवत आहेत. थंडीमुळे वर्षभर कपाटात पडून राहिलेल्या स्वेटर-मफलरच्या घड्या मोडल्या असून, अनेक जण, तर दिवसाही उबदार कपडे घालून बाहेर पडत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे निसर्गालाही चांगलीच झळाळी मिळाली आहे. कोरडे वातावरणा आणि निसर्गाला आलेला टवटवीतपणा हौशी पर्यटनप्रेमींचे जथे म्हैसमाळ-दौलताबादकडे जाण्यास मोहित करीत आहे. तसेच हिवाळ्यात व्यायामाचा चंग बांधलेले अनेक जण सार्वजनिक बागा आणि जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. मसाला दूध विक्रीनेही जोर धरलेला आहे.