विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू;परवानगी मिळो अथवा न मिळो,सभा होणारच,मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 04:14 PM2022-04-22T16:14:51+5:302022-04-22T16:16:18+5:30
अनेक संघटनांचा सभेला पाठिंबा मिळत असून समाजात तेढ निर्माण होईल, असे ठाकरे कधीही बोलत नाहीत. मात्र ज्यांना त्यांची भीती वाटत आहे, तेच विरोध करीत आहेत
औरंगाबाद : महाराष्ट्र दिन १ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला परवानगी मिळो, अथवा न मिळो, सभा होणारच; अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली असून विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू. ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच होईल, गरवारे स्टेडियमवर आम्हाला चालणार नाही. कुणी विरोध केलाच तर आम्हीदेखील हातावर हात धरून बसलो नाहीत, असा इशारा मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
शिवसेनेवर टीका करताना धोत्रे म्हणाले, सेनेला आता फार काम राहिलेले नाही. त्यातच राज ठाकरे यांनी येथे सभा घेण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेना सभेला परवानगी मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे का, असे विचारले असता त्यांनी शिवसेनेला सध्या काही काम राहिलेले नसून एमआयएमच्या पाठिंब्यावर आमदार निवडून आणणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला धोत्रे यांनी लावला. ठाकरे सभेत काय बोलणार, याची नागरिकांसोबतच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अनेक संघटनांचा सभेला पाठिंबा मिळत असून समाजात तेढ निर्माण होईल, असे ठाकरे कधीही बोलत नाहीत. मात्र ज्यांना त्यांची भीती वाटत आहे, तेच विरोध करीत असल्याचा आरोप धोत्रे यांनी केला. यावेळी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन, उपाध्यक्ष सतनाम गुलाटी, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, सुमीत खांबेकर, राजू जावळीकर, आशिष सुरडकर, संकेत शेटे, वैभव मिटकर, गजन गौडा, बिपीन नाईक, आकाश खोतकर, चिन्मय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
मैदान बदलण्यासाठी पोलिसांकडून विनवण्या
ठाकरे यांची सभा औरंगपुरा परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेण्याचे नियोजन आहे. मात्र ही सभा चिकलठाण्यातील गरवारे स्टेडियमवर घ्यावी, अशी विनंती पोलिसांनी केल्याच्या माहितीवर बोलताना धोत्रे म्हणाले, कोणत्याही स्थितीत मैदान बदलणार नाही. आधी ठरलेल्या ठिकाणीच मनसेची सभा होईल. त्यासाठी परवानगी मिळो अथवा न मिळो, सभा होईलच.