आजी-माजी सरपंचांच्या गटांत पाईपलाईनवरून तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:35 PM2017-12-28T23:35:02+5:302017-12-28T23:35:13+5:30
पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कारणावरून आजी -माजी सरपंचांच्या गटात तुफान हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, तलवारी चालल्याने सरपंचासह पंधरा जण गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोड : पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कारणावरून आजी -माजी सरपंचांच्या गटात तुफान हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, तलवारी चालल्याने सरपंचासह पंधरा जण गंभीर जखमी झाले.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाचोड पोलिसांनी रांजणगाव दांडगा व पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
गुरुवारी दुपारी सरपंच शेख रियाज यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवक आले व नवीन पाईपलाईनची मोजणी सुरु केली.
याचवेळी माजी सरपंच अकील पटेल यांनी या पाईपलाईनवर आक्षेप घेतला. यावरुन दोघांत बाचाबाची झाली. गावकºयांनी हे भांडण सोडवले. काही वेळातच दोन्ही गट समोरासमोर आले व तुंबळ हाणामारीस सुरुवात झाली. यात दोन्ही गटातील पंधरा जण जखमी झाले. पोलीस पाटील श्याम शेजूळ यांनी तातडीने पाचोड पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. सपोनि. महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकसिंगे यांनी लगेच आपला फौजफाटा सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.
सर्व जखमींना तात्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भोजने, डॉ. राहुल दवणे, डॉ. काशिनाथ स्वामी, डॉ. सुनीता बांगर, गजानन काफरे, राहुल पवार, नितीन गडकरी व जाधव यांनी जखमींवर उपचार केले. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींची नावे
सरपंच शेख रियाज (३५), शेख राजू (३५), फिरोज शहा (१८), शेख इसाक (४५), फैयाज शब्बीर (३२), इम्रान इसाक शेख , (१८), राजू शाम्मद (३०), अफसर शाम्मद (२६), शेख कदीर (२२).