वाघ्या मुरळी, लोककलावंत कामाच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:04 AM2021-07-08T04:04:32+5:302021-07-08T04:04:32+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक तसेच गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. परंतु अनलॉक प्रक्रियेत वाघ्या-मुरळी ...
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक तसेच गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. परंतु अनलॉक प्रक्रियेत वाघ्या-मुरळी कलावंत तसेच पूजेचे साहित्य विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून, ते कामाच्या शोधात आहेत. विवाह समारंभाचे बार मोजक्याच लोकांत उडविले जात आहेत. तर मंदिरात किंवा धार्मिक कार्यक्रमासाठीदेखील आमंत्रण देण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे कलावंतांना खूप हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे. पूर्वी कलावंतांना किमान दिवसाआड जागर, गोंधळाच्या कार्यक्रमासाठी बोलावणे असायचे मात्र दीड वर्षापासून त्यांना कुटुंबाचे पोट भरण्याची भ्रांत निर्माण झाली आहे.
बहुतांश कलावंत भाजीपाला विक्री तसेच चहाचे स्टॉल चालवित असून, अनेक जण कारखान्यात काम करीत आहेत. चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, चितेगावपर्यंत कलावंत कामाला गेलेले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कलावंत कामांच्या शोधात आहेत. कलावंताची वाद्ये धूळ खात पडलेली आहेत. दोन वर्षापासून त्यावरील धूळदेखील साफ झालेली नाही.
मंदिराची कवाडे बंद झाली असून, कोरोनाने कलावंतांची मोठी गैरसोय सुरू केली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मिळेल ते काम करावे लागत आहेत. आठवडाभरदेखील हाताला काम मिळत नाही. उपासमारीच कलावंताच्या नशिबी आलेली आहे. शासनाच्या मदतीची अपेक्षा असतानाही दमडी मिळालेली नाही.
- दौलत चव्हाण (अबा) (कलावंत सातारा, औरंगाबाद)
कारखान्यात हंगामी मजुरी...
औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण असावे लागते. प्रशिक्षण व अनुभव नसल्याने बहुतांश कारखान्यात ठेकेदाराकडे हंगामी मजुरी करावी लागत आहे. मजुरीच्या तुलनेत पैसे मिळत नाही. कलावंताची कला लोप होण्याच्या मार्गावर असून, पोट भरण्यासासाठी कलावंतांना हे सर्व सहन करावे लागत आहे.
- परमेश्वर आरते (कलावंत सातारा, औरंगाबाद)
कोरोना नियमाने बंदच...
शासनाच्या आदेशाने मंदिर बंद असून, कलावंतांना मंदिरात येण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे. संसर्ग होऊ नये म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. भाविकांचीही संख्या घटलेलीच आहे. पुढील आदेशाशिवाय मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
- अध्यक्ष- साहेबराव पळसकर, सचिव - गंगधार पारखे ( खंडोबा मंदिर विश्वस्त, सातारा औरंगाबाद )