प्राणिसंग्रहालयात जन्मले वाघांचे बछडे
By Admin | Published: August 27, 2014 12:12 AM2014-08-27T00:12:34+5:302014-08-27T00:16:09+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. महिनाभरापूर्वीच पिलांचा जन्म झाला असून, त्या पिलांनी आजवर डोळे उघडलेले नाहीत.
त्यांना संंग्रहालयातील अतीव दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पिलांची काळजी घेतली जात असून कुणालाही तिथपर्यंत जाऊ दिले जात नाही. असे सूत्रांनी सांगितले. वाघिणीने तीन पिलांना जन्म दिला होता. मात्र, एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच मनपाने वाघाच्या पिलांच्या जन्माची बातमी बाहेर येऊ दिली नसल्याचा संशय येतो आहे.
मे महिन्यात ३ पिवळ्या वाघाच्या पिलांचा जन्म झाला होता. ती माहितीही संग्रहालयाने दडवून ठेवली होती. पिलांना संसर्ग होऊ नये. यासाठी ती माहिती दडवून ठेवली होती असे सूत्रांनी सांगितले. तीन महिन्यांत उद्यानामध्ये ५ वाघांच्या पिलांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये तीन पिवळ्या व दोन पांढऱ्या वाघांचा समावेश आहे.
संग्रहालयातील प्राणिसंपदा
सध्या संग्रहालयात पिवळे वाघ ५, पांढरे वाघ ४, बिबट्या मादी १, हत्ती २, अस्वल २, नीलगायी ८, सांबर ३५, काळवीट ४२, चितळ २, तडस ३, लांडगा १, सायाळ ४, उदबिल्ला ५, इमू २, पाणपक्षी २८, माकड ३, मगर ९, चांदणी कासव ४९, पाण्यातील कासव ५ व विविध जातींचे ८८ सर्प अशी प्राणीसंपदा आहे, अशी माहिती उद्यानाच्या सूत्रांनी दिली.
एका पिलाचा मृत्यू?
प्राणिसंग्रहालयात पिले केव्हा जन्मली, त्यांची संख्या किती होती. यावर कुणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. दरम्यान, तीन पिलांना वाघिणीने जन्म दिला होता. परंतु त्यातील एका पिलाचा मृत्यू झाल्याची चर्चा होती.
मात्र, त्याप्रकरणी कुणीही बोलण्यास तयार नाही. मंगळवारी उद्यान बंद असते, तसेच प्राणिसंग्रहालय अधीक्षक डॉ.बी.एच.नाईकवाडे हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे याप्रकरणी कुणीही माहिती देण्यास पुढे आले नाही. गेल्यावर्षी एका पिलाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला होता.