दिव्यांग मुलासाठी संसारावर तुळशीपत्र

By Admin | Published: May 14, 2017 12:32 AM2017-05-14T00:32:29+5:302017-05-14T00:34:33+5:30

लातूर : अवघ्या वर्षभरानंतर पतीनेही मुलावर उपचार करण्यास नकार देत दुसरा संसार थाटला़ अशा परिस्थितीत कुठलीही हार न मानता संसारावर तुळशीपत्र ठेवून ती माता दिव्यांग मुलावर नऊ वर्षांपासून उपचार करीत आहे़.

Till brochure on the world for Divya's son | दिव्यांग मुलासाठी संसारावर तुळशीपत्र

दिव्यांग मुलासाठी संसारावर तुळशीपत्र

googlenewsNext

लातूर : सुखी संसाराची वेल बहरत असताना दोन मुले झाली़ त्यामुळे पती-पत्नीच्या आनंदाला पारवार उरला नाही़ परंतु, त्यातील पहिला मुलगा हा दिव्यांग़ ही बाब नवऱ्यासह सासरच्या मंडळींना बोचत होती़ असा मुलगा राहून तरी काय करणार? अशा मानसिकतेत सासरची मंडळी असताना तिने मात्र या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी पतीला राजी करुन लातूर गाठले़ परंतु, अवघ्या वर्षभरानंतर पतीनेही मुलावर उपचार करण्यास नकार देत दुसरा संसार थाटला़ अशा परिस्थितीत कुठलीही हार न मानता संसारावर तुळशीपत्र ठेवून ती माता दिव्यांग मुलावर गेल्या नऊ वर्षांपासून सतत उपचार करीत आहे़.. ही व्यथा आहे, कानेगावच्या सावित्री मोटाडे यांची़
‘माझ्या माईच्या पुढं थिटं,
सारं देऊळ राऊऴ़़
तिच्या फाटलेल्या टाचा मंदी,
माझं अजिंठा-वेरुळ’
या उक्तीप्रमाणे जीवन व्यतित करणाऱ्या गोपाळची अवस्था यापेक्षा वेगळी नाहीच. जन्मताच दिव्यांग असलेल्या गोपाळला आईशिवाय कुठली हालचाल करता येत नाही. वय वर्ष १८ असले तरी दोन वर्षाच्या मुलाप्रमाणे त्याचे जगणे सुरू आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील शेतकरी रघुनाथ तोटे यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले़ रघुनाथरावांची दुसरी मुलगी सावित्री हिचा विवाह कानेगाव (ता.शिरुर अनंतपाळ) येथील सुनील मोटाडे यांच्याशी सन १९९६ मध्ये झाला़ सावित्रीच्या संसाराची वेल बहरत होती़ निसर्ग नियमाप्रमाणे नैसर्गिक बाळंत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले़ उभयतांचा आनंद गगनात मावेना झाला. परंतु, हा मुलगा दिव्यांग असल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. आनंदावर विरजण पडले़ सासरच्या मंडळींच्या मनात खंत निर्माण झाली़ ही खंत दूर व्हावी म्हणून माहेरच्या मंडळींनी गोपाळवर उपचार केल्यानंतर तो बरा होईल, असे सांगून मन परिवर्तन केले़ त्यासाठी तोटे कुटुंबियांनी सुरुवातीस गोपाळच्या उपचाराचा खर्चही उचलला़ गोपाळवर उपचार चालूच होते. दरम्यान, सन १९९९ मध्ये सावित्रीला दुसरा मुलगा झाला़ अजय त्याचे नाव. एकीकडे अजयमुळे आनंद तर दुसरीकडे गोपाळचे कसे होईल, याची चिंता सावित्रीला सतावत होती. गोपाळवर चांगल्या ठिकाणी उपचार केले पाहिजे, यासाठी तिने पतीला राजी केले़ लातुरातील संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु झाले़ वर्ष-दीड वर्षाचा कालावधी उलटताच पती सुनीलला मुलावर उपचार करणे निरर्थक वाटू लागले़ त्यामुळे सावित्री आणखी चिंताग्रस्त झाल्या़ मुलगा दिव्यांग असला तरी त्याचा आपणच सांभाळ केला पाहिजे, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली़ पण पत्नी ऐकत नसल्याचे पाहून सुनीलने बायको-लेकराला वाऱ्यावर सोडले. २०१३ मध्ये त्याने दुसरा विवाह केला़ आधार तुटलेल्या सावित्री कोलमडल्या, पण हार मानली नाही़ दोन मुले हेच आपले सर्वस्व मानून जिद्दीने परिस्थितीशी सामना केला. दरम्यान, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रात त्यांना केंद्रातच काळजीवाहक म्हणून नियुक्त केले़ तेथील वेतन तुटपुंजे असल्याने बहीण सुमित्रा तोटे व भावाने मदतीचा हात दिला़ अजय पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे तर गोपाळ परिस्थितीशी झगडतो आहे...

Web Title: Till brochure on the world for Divya's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.