औरंगाबादेत शिक्षकांवर आंदोलनाची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:58 PM2018-02-17T23:58:42+5:302018-02-17T23:58:49+5:30
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने आज शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने आज शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सायंकाळी काँग्रेसचे आ. सुभाष झांबड यांनी आंदोलनस्थळी जाऊन अधिकारी- पदाधिकाºयांना बोलावून घेतले. त्यावेळी शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती धनराज बेडवाल, काँग्रेसचे पैठण तालुकाध्यक्ष विनोद तांबे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकाºयांनी स्थायित्वाचे ६१३ प्रस्ताव प्रातिनिधिक स्वरुपात निकाली काढले व ते शिक्षक भारतीच्या पदाधिकाºयांकडे सुपूर्द केले.
वेतनप्रणाली आॅनलाईन असो की आॅफलाईन, शिक्षकांचा पगार हा कधीच १० तारखेच्या आत झालेला नाही. विमा, बँक, रेल्वे विभागात एक तारखेलाच पगार होतो. जि.प.लाच नेमकी कोणती अडचण आहे. केंद्रप्रमुखांची ७५ पदे रिक्त असताना पदोन्नती प्रक्रिया राबविली जात नाही. शालेय पोषण आहाराची देयके रखडली जातात. निमशिक्षक, अंशदायी पेन्शन इत्यादी प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
जि. प. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक हे या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, अनिल देशमुख, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, राजेश भुसारी, किशोर कदम, मुश्ताक शेख, मच्छिंद्र भराडे, मच्छिंद्र शिंदे, रमेश जाधव, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत, स्वाती गवई, सुप्रिया सोसे, संजय बुचुडे, विजय ढाकरे, गणेश तोटावाड, दत्ता गायकवाड, रामदास कवठेकर, गोविंद उगले, संजय देव्हरे, अमरसिंग चंदेल, प्रवीण संसारे आदींसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
आ. सुभाष झांबड यांची भेट
जिल्हा या आंदोलनाच्या वेळी आ. सुभाष झांबड यांनी भेट दिली. ते म्हणाले की, शिक्षकांच्या लहान-सहान प्रश्नांसाठी शिक्षकांवर आंदोलनाची वेळ यावी, ही दुर्दैवी बाब आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न समजून घेण्यात आमचे पदाधिकारी कमी पडले असावेत. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्या. येत्या आठ दिवसांत प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत तर विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षक परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू शिक्षक व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, याबाबत शिक्षक परिषदेने अनेकवेळा शासनाला निवेदने सादर केली. या प्रश्नावर आंदोलनेही केली; परंतु याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. याशिवाय शिक्षक-कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत दिरंगाई होत आहे. यासंदर्भात आंदोलन करण्याचा ठराव राज्य कार्यकारिणीने घेतला होता.
त्यानुसार आज शनिवारी शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले. निवेदनात नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्र सरकारप्रमाणे राज्यानेही सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, या मागण्यांचा समावेश करण्यात आला. या धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस सुधाकर म्हस्के, सुरेश पठाडे, बाबूराव गाडेकर, प्रभुलाल झलवार, श्रीराम बोचरे, दिलीप गोरे, प्रकाश लोखंडे, दिलीप कुंदे, जिजा उकर्डे, जगन ढोके, लता पठाडे, रेखा शिंदे, शीतल शेळके, संगीता बोरसे, आशा वैष्णव, सुशीला पवार, किरण गाडेकर, प्रकाश बोंबले, शिवाजी दांडगे, लक्ष्मण भोसले, संजय शेळके, दीपक नरवडे, अर्जुन दांडगे आदींनी परिश्रम घेतले.