तिकिटांच्या रांगेतच जातो अजिंठाच्या पर्यटकांचा वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:34 AM2018-07-15T05:34:01+5:302018-07-15T05:34:04+5:30
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत प्रवेश करण्यापासून, ते बाहेर पडेपर्यंत एकूण सहा तिकिटे पर्यटकांना काढावी लागत आहेत.
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत प्रवेश करण्यापासून, ते बाहेर पडेपर्यंत एकूण सहा तिकिटे पर्यटकांना काढावी लागत आहेत. एक तिकिट घेत नाही, तोच दुसरे तिकिट घेण्याची वेळ येते. त्यासाठी रांगेतच बराच वेळ जात असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
लेणीच्या रस्त्यावर प्रवेश करीत नाही तोच पर्यटकांचे वाहन अडविण्यात येते. या ठिकाणी प्रारंभी पार्किंग शुल्क आकारण्यात येते. पार्किंग शुल्काबरोबरच येथे सोयीसुविधा शुल्क म्हणून दहा रुपयांचे वेगळे तिकिट आकारले जाते. त्यानंतर लेणीपर्यंत नेणाऱ्या बससाठी रांगेत उभे राहून २० रुपयांचे एसटी महामंडळाचे तिकिट घ्यावे लागते.
तिकिट घेऊन पर्यटक लेणीच्या पायथ्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा लेणीत प्रवेश करण्यासाठी ३० रुपयांचे तिकिट घ्यावे लागते. त्यामुळे पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ पर्यटकांवर येते. त्यानंतर लेणीत प्रकाश शुल्क म्हणून आणखी एक पाच रुपयांचे तिकिट घ्यावे लागते.