मनपावरच गुन्हे दाखल करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:11 AM2018-06-18T01:11:36+5:302018-06-18T01:11:52+5:30
मनपा प्रशासन याचाच आधार मागील चार महिन्यांपासून घेत आहे. आमखास तलावाजवळील कमल तलाव ५० लाख रुपये खर्च करून स्वच्छ करण्यात आला. त्याच तलावात महापालिका प्रशासन कचरा टाकत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आता खंडपीठानेच महापालिकेवर घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करायला हवेत.
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कचरा प्रश्नात महापालिकेने घनकचरा नियमावली धाब्यावर बसविली आहे. नियमानुसार मनपाला कचरा जाळता येत नाही. जमिनीत खड्डे करून पुरता येत नाही. जलस्रोतामध्ये कचरा नेऊन टाकता येत नाही. मनपा प्रशासन याचाच आधार मागील चार महिन्यांपासून घेत आहे. आमखास तलावाजवळील कमल तलाव ५० लाख रुपये खर्च करून स्वच्छ करण्यात आला. त्याच तलावात महापालिका प्रशासन कचरा टाकत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आता खंडपीठानेच महापालिकेवर घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करायला हवेत.
शहरात १६ फेब्रुवारीपासून अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण झाली आहे.
५० लाख रुपये खर्च
ऐतिहासिक कमल तलावाला गतवैभव मिळावे म्हणून चार वर्षांपूर्वी शासनाने ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून गाळ काढणे, तलावातील घाण, केरकचरा काढण्याचे काम महापालिकेने आपल्या पद्धतीने केले. तलाव विकसित करण्याचे काम झाले नाही. तलावातील पाण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी आलेली आहे. तलावाच्या बाजूला नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस लावण्यात आले आहेत. नागरिक सायंकाळी, सकाळी येथे शुद्ध हवा मिळते म्हणून बसतात.
डम्पिंग यार्ड
कमल तलावात मागील तीन महिन्यांपासून मध्यरात्री कचरा आणून टाकण्याचे पाप या भागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी करीत आहेत. तीन महिन्यांत कमल तलावाची अवस्था डम्पिंग यार्डसारखी झाली आहे. मनपाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवरच आता घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे.