यंदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचाली ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 07:10 PM2019-05-14T19:10:22+5:302019-05-14T19:11:20+5:30
शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावण्यास सुरुवात केली आहे.
- विकास राऊत
औरंगाबाद : महाराष्ट्रात यावर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज सॅसकॉफ (साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम) ने व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने यंदा राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. २०१५ मध्ये औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, ते फसले असून, यावेळी शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावण्यास सुरुवात केली आहे.
सॅसकॉफची काठमांडू येथे परिषद झाली. त्या परिषदेतील हवामानतज्ज्ञांच्या चर्चेनुसार राज्यातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिषदेच्या हवाल्यानुसार राज्यात कृत्रिम पावसाची गरज असल्याचे काही हवामानतज्ज्ञ बोलू लागले आहेत. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत अशा स्कीमवर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले होते. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होते. ४५० कि़मी.च्या अंतरात पूर्ण राज्यात येथून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण घेतले; परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा केलेला प्रयोग फसला तरीही २०१७ मध्ये सोलापूर येथून प्रयोगासाठी प्रयत्न झाले.
औरंगाबादेतील प्रयोगासाठी ३ हजार सिल्वर आयोडाईड, सिल्वर कोटेड नळकांडे (सिलिंडर) कोट्यवधी रुपयांतून खरेदी केले. ते सिलिंडर विमानतळावर ठेवल्याचे सांगण्यात आले. केवळ ५०० सिलिंडर वापरले, उर्वरित २५०० सिलिंडर उंदरांनी खाल्ले, की ख्याती वेदर मॉडिफिकेशन या कंपनीने परत नेले की, यंत्रणेने विकले, याची काहीही माहिती प्रशासनाकडे नाही. २०१५ मध्ये मराठवाड्यात केलेल्या प्रयोगातून जवळपास २०० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद कंपनीने केली होती; परंतु प्रत्यक्षात तेवढा पाऊस झालाच नाही.
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे दुष्परिणाम
कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे पाऊस न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. प्रयोगात वापरले जाणारे सिल्वर आयोडाईड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. या कारणास्तव आॅस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आहे. विमानाने कृत्रिम पावसाचा प्रयोग मान्सूनपूर्व आणि मान्सुनोतर काळात करणे अतिशय धोकादायक असल्याचे मत हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.
संचालकांनी बोलणे टाळले
राज्य आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, याबाबत माझ्याकडे काहीही माहिती नाही, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे सध्या या विषयावर काहीही बोलणे शक्य नाही. तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल, आयुक्तालयाकडे अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.