घाटी रुग्णालयात पडदा टाकून भिंती झाकण्याची वेळ, दुरावस्थेने पाहुण्यांसमोर 'लज्जारक्षणा'ची पाळी
By संतोष हिरेमठ | Published: September 26, 2023 04:55 PM2023-09-26T16:55:56+5:302023-09-26T16:57:28+5:30
इमारतीमधील छताची, भिंतीची दुरवस्था दिसू नये म्हणून पडदा टाकून काही भाग झाकण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयाचा कणा मानल्या जाणाऱ्या सर्जिकल इमारतीला ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. परिणामी, ही सर्जिकल इमारत जागोजागी धोकादायक झाली आहे. त्यामुळे ५०० कोटी रुपयातून नवीन सर्जिकल इमारत बांधण्याचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला. परंतु, प्रस्ताव मार्गी लागण्याची प्रतीक्षाच करावी लागत असल्याने दुरवस्थेवर पडदा टाकून भिंती झाकण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर ओढावत आहे.
घाटीतील सर्जिकल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साकारण्यात आलेल्या मानवी दूध बँकेचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर पाहुण्यांनी हजेरी लावली. अपघात विभागापासून विविध वाॅर्ड असलेल्या सर्जिकल इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात विभागातून मानवी दूध बँकेकडे जाताना पायऱ्यांवर, भिंतीवर पडदे लावण्यात आले होते. इतकेच काय नातेवाइकांची गर्दी दिसू नये म्हणून ट्रेचर आडवे लावून त्यावर नातेवाइकांचे सामान ठेवण्यात आले होते.
नवीन इमारत कधी?
नवीन अद्ययावत सहा मजली इमारतीसाठी ५०० कोटींचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. ही नवीन इमारत कधी मार्गी लागेल, याकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष आहे.