शिक्षक बदल्यांसाठी पुन्हा प्रतीक्षेचीच वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:35 AM2017-11-09T00:35:07+5:302017-11-09T00:35:11+5:30
शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघाला नाही. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणार असल्याने शिक्षक मंडळी एकीकडे हैराण तर दुसरीकडे ज्यांना बदली अपेक्षित आहे, ते जाम खुश आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघाला नाही. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणार असल्याने शिक्षक मंडळी एकीकडे हैराण तर दुसरीकडे ज्यांना बदली अपेक्षित आहे, ते जाम खुश आहेत.
शिक्षकांना संवर्ग १ ते ४ मध्ये विभागून त्या-त्या निकषानुसार आॅनलाईन बदल्या करण्याचा शासन निर्णय धडकल्यानंतर त्याला बराच विरोध झाला. मात्र तरीही शासनाने ही प्रकिया रेटून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेला कितीही विरोध झाला, न्यायालयात प्रकरण गेले तरीही ही प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत आणण्यासाठी दिवाळीपर्यंतचा काळही पुरला नाही. दिवाळीच्या सुट्यांतही संवर्ग-३ व ४ च्या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे यात इच्छा नसतानाही अनेकांचे सक्तीने अर्ज भरून घेण्यात आले. सर्व्हरवर अतिरिक्त ताण असल्याने दिवाळीच्या सुट्या शिक्षकांनी याच एका कामात खर्ची घातल्या. त्यानंतरही दोनदा मुदतवाढ द्यावी लागली. यानंतर या बदल्या होण अपरिहार्य दिसत असल्याने विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत मोर्चे काढून आपला विरोध दर्शविला. यात नव्या शिक्षकांपेक्षा जुन्या शिक्षकांचाच विरोध मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच समायोजन झालेल्यांनाही बदलीचा झटका बसू शकतो, हे दिसू लागल्याने तीव्र विरोध होता. मात्र अजून मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या लॉग इनचे काम बाकी असल्याने या बदल्या झाल्या नसल्याचे सांगितले जाते. जर या बदल्या झाल्याच तर आपल्यालाही ‘खो’ बसतो काय? नवीन ठिकाणी कधी रुजू व्हावे लागेल, याची चिंता शिक्षकांना दिसत आहे.