टिप्या गँगने कारागृह सुरक्षा पोलिसाला डांबून लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:03 AM2021-09-25T04:03:57+5:302021-09-25T04:03:57+5:30
औरंगाबाद : कुख्यात टिप्या उर्फ शेख जावेद शेख मकसूद याच्यासह तीन साथीदारांनी हर्सूल कारागृह सुरक्षा पोलिसाला डांबून रोख १५ ...
औरंगाबाद : कुख्यात टिप्या उर्फ शेख जावेद शेख मकसूद याच्यासह तीन साथीदारांनी हर्सूल कारागृह सुरक्षा पोलिसाला डांबून रोख १५ हजार रुपयांसह फोन पेद्वारे दोन लाख रुपये लुबाडले. या सुरक्षारक्षकाच्या तुळजापूर शिवारातील एक प्लॉटचे खरेदीखत करून घेतल्याचा प्रकार १८ सप्टेंबर रोजी घडला. गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसाला लुटणाऱ्या एका महिलेसह तिघांच्या मुसक्या आवळल्या असून अद्याप टिप्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार टिप्याची मैत्रीण असलेल्या एका संगणक अभियंता महिलेने हर्सूल कारागृहात रक्षक असलेल्या सतीश तुकाराम उबरहंडे यांच्या पत्नीच्या नावे अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज घेण्यासाठी फाइल तयार केली. या फाइलसाठी चार लाख चाळीस हजार रुपये खर्च झाले. ही रक्कम देण्याच्या मागणीसाठी टिप्याच्या मैत्रिणीने उबरहंडे यांच्याकडे तगादा लावला. टिप्याने १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक सीताराम केदारे यांना शिवाजीनगर येथे जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस मागावर असतील म्हणून टिप्याने पैशासाठी मैत्रिणीच्या मदतीने अर्जुन राजू पवार पाटील, दीपक दसपुते पाटील यांच्यासह कट रचून उबरहंडे यांना सिडकोमधील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणी टिप्यासह चौघांनी चाकूचा धाक दाखवून ४ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने एका कारमध्ये डांबून ठेवले व सुरक्षा रक्षकाकडे असलेले १५ हजार रुपये काढून घेतले. तसेच जबरदस्तीने बँक अकाउंटमध्ये असलेले १ लाख रुपये फोन पेद्वारे ट्रान्सफर केले. याशिवाय उबरहंडे यांच्या नावावर असलेला तुळजापूर शिवारातील गट नं. ५३, प्लॉट नंबर १५२ हा टिप्याच्या मैत्रिणीच्या नावे बाँडवर खरेदीखत करून घेतला. यानंतर टिप्या पळून गेला. त्यानंतर गुन्हे शाखेने टिप्याच्या संपर्कातील तिघे आणि कारागृह सुरक्षारक्षक यांना ताब्यात घेत चौकशी केली. यातूृन हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सुरक्षारक्षकाने तक्रार दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.
हा सर्व प्रकार गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, विठ्ठल जवखेडे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, विजय भानुसे, नितीन धुळे, संदीप बीडकर, लखन गायकवाड आणि पर्भत म्हस्के यांच्या पथकाने उघडकीस आणला.
चौकट,
२६ पर्यंत पोलीस कोठडी
टिप्याचे तीन साथीदार गुन्हे शाखेने पकडल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हवाली केले. यानंतर टिप्याच्या मैत्रिणीसह अर्जुन पाटील, दीपक दसपुते यांना न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक अमरनाथ नागरे करीत आहेत.