अकरा कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकित
By Admin | Published: January 20, 2017 12:17 AM2017-01-20T00:17:08+5:302017-01-20T00:19:04+5:30
येडशी : येथील ग्रामपंचायतीच्या ११ कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासून पगार थकला
येडशी : येथील ग्रामपंचायतीच्या ११ कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासून पगार थकला असून, पगारीअभावी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ दरम्यान, ग्रामपंचातयीच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या विविध करापोटी थकीत रक्कम ८८ लाख रूपये असून, ही रक्कम वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे़
ग्रामपंचायतीच्या विविध कामांसाठी ११ कर्मचारी कार्यरत आहेत़ मात्र, चार महिन्यावंपासून या कर्मचाऱ्यांचया पगारी थकीत आहेत़ याशिवाय गावातील नळ योजना बंद पडली असून, पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ अनेक पथदिवे बंद असून, ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी रस्ता शोधण्यासाठी बॅटरीचा वापर करावा लागत आहे़स्वच्छतेसह इतर समस्या आ वासून उभा आहेत़ वीज, पाणी, रस्ता अशा मुलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांची गैरसोय होत आहे़
एकीकडे समस्या निर्माण झाल्या असल्या तरी दुसरीकडे जवळपास एक कोटी रूपयांचा विविध कराची रक्कम थकीत आहे़ येडशी ग्रामपंचायतीला चमडा बाजार, आठवडा बाजार, दुकान भाडे, रामलिंग यात्रा कर, गामपंचायत गाळे अशा विविध मार्गानी उत्पन्न मिळते़ याशिवाय घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर, आरोग्य कर विविध प्रकारचा एकूण ८८ लाख रुपये कर थकला आहे़ परिणामी ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कोलमडल्याचे सांगण्यात येत आहे़ येडशी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे ३ हजार ५२५ कर मागणी खातेदार आहेत. यामध्ये गावातील घराची घरपट्टी व पाणीपट्टी ६७ लाख ८५० तसेच शासकीय कार्यालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ८ लाख ६ ५ हजार ४३१ रुपये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ३ लाख ३६ हजार ३२०, भारत संचार निगम लिमिटेड ५४ हजार ४८८ बसस्थानक १ लाख ३५११३ असा एकूण ८८ लाख रुपये कर थकला आहे. या करांची वसुली करून मुलभूत समस्या सोडविण्यासह कर्मचाऱ्यांच्या पगारी कराव्यात, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)