जिल्ह्यात लाखो रुपयांचा करमणूक कर थकला
By Admin | Published: September 20, 2014 12:02 AM2014-09-20T00:02:29+5:302014-09-20T00:07:14+5:30
परभणी : जिल्ह्यात लाखो रुपयांचा करमणूक कर थकला
परभणी : जिल्ह्यात लाखो रुपयांचा करमणूक कर थकला असून, जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. जुलै २०१३ अखेर या करापोटी केवळ ८६ लाख ४० हजार रुपयांची वसुली प्रशासनाच्या खात्यात जमा झाली आहे.
चित्रपटगृह, व्हिडीओगृह, व्हिडीओ गेम पार्लर, केबल, डी. टी. एच. धारकांकडून जिल्हा प्रशासन करमणूक कर वसूल करते. या कराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या महसूलात भर पडते. करमणुकीच्या या साधनांचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असला तरी त्यापोटी भरला जाणारा कर मात्र नगण्य आहे. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाला ३५० लाख रुपयांचे उद्दीष्ट विभागीय आयुक्त कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले होते. परंतु त्या तुलनेत जुलै २०१३ अखेर केवळ ८६ लाख ४० हजार रुपयांचा कर प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे. उद्दिष्टाच्या प्रमाणात केवळ २४.६९ टक्के कराची वसुली झाली आहे. तर शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या ३६ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे कर न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या जिल्ह्यात मोठी असल्याचे लक्षात येते.
(प्रतिनिधी)