सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:02 AM2021-09-02T04:02:27+5:302021-09-02T04:02:27+5:30
औरंगाबाद : व्यवसाय करण्यासाठी माहेरून पैसे आणावे, याकरिता विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त ...
औरंगाबाद : व्यवसाय करण्यासाठी माहेरून पैसे आणावे, याकरिता विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना वेदांतनगर परिसरात २९ ऑगस्ट रोजी घडली. मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी पतीसह सासू आणि नणंदेविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पती योगेश अशोक खेत्रे, सासू कमलबाई अशोक खेत्रे आणि नणंद सुनीता विनोद पगारे अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार सुनील मुरलीधर सोनवणे (४७, रा. हर्सूल) यांची मुलगी पल्लवी आणि योगेश यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर आरोपी योगेशने पल्लवीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी योगेश आणि त्याची आई, बहीण करीत. आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पैशाची मागणी पूर्ण करता येणार नाही, असे तीने सासरच्या मंडळींना सांगितले. एवढेच नव्हे तर ही बाब पल्लवीने माहेरी सांगितली होती. तेव्हा त्यांनीही आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरीही तिला त्रास कमी झाला नव्हता. ही बाब नुकत्याच झालेल्या राखी पौर्णिमेच्या दिवशी पल्लवीने माहेरी आल्यावर सांगितली होती. पतीसह सासू आणि नणंद उठता, बसता टोमणे मारते त्यांच्या त्रासामुळे जीवन जगणे असह्य झाल्याचे तिने सांगितले होते. तेव्हा नातेवाइकांनी तिची समजूत काढली होती. मात्र हा जाच असह्य झाल्याने शेवटी तिने २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील सोनवणे यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात पल्लवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.