लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 05:04 PM2024-10-16T17:04:39+5:302024-10-16T17:06:36+5:30

फडणवीसांची राज्यातील पूर्ण प्लॅनिंग फेल करणार; मनोज जरांगे यांचा इशारा

To fight or to destroy! Final meeting called by Manoj Jarange on 20th October | लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

वडीगोद्री( जालना):मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री  फडणवीस यांची राज्यातील विधानसभेची प्लॅनिंग पूर्ण अपयशी करणार असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज दिला. “मला मोठ्या डाकूला खेटायचं आहे” असे जाहीर करत २० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची अंतिम निर्णय बैठक आयोजित केली असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. आज सकाळी महायुती सरकारमधील सर्व पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले की, २० तारेखेच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करायचे की सरकारविरोधात लढायचे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चेसाठी उद्या अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली आहे. त्यांनी आवाहन केले की, ज्यांना शक्य आहे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहावे आणि मराठा समाजाच्या भविष्यातील दिशा ठरवण्यात आपला सहभाग द्यावा. 

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली मात्र, एकमात्र एकनाथ शिंदेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, असे सांगितले. शिंदे यांच्या धाडसी भूमिकेचे समर्थन करत जरांगे म्हणाले की, “तुम्हाला कोण काम करून देत नाही हे आम्हाला माहित नाही. मी सहा कोटी मराठ्यांना सांगितलं होतं की शिंदे साहेब आरक्षण देतील, पण अजूनही ते मिळालेलं नाही.”

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले की, “फडणवीस यांनी ओबीसींमध्ये १५ जातींचा समावेश करून मराठ्यांचे प्रमाणपत्र रोखले. केसेस केल्या, ज्यामुळे मराठा युवकांना नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवणे कठीण झाले. फडणवीस यांनी दिलेले आश्वासन फसवे ठरले.”  जरांगे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि नुकसानीच्या भरपाईच्या मुद्द्यांवरही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल त्यांनी सरकारला धारेवर धरले. “तुम्हाला आमचे मुडदे बघायची सवय लागली आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारविरोधातील असंतोष व्यक्त केला.

निर्णय झाल्यास मागे हटणार नाही
२० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत मराठा समाजाचा पुढील राजकीय निर्णय ठरवला जाईल, आणि जर एकदा निर्णय झाला तर तो मागे घेतला जाणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

Web Title: To fight or to destroy! Final meeting called by Manoj Jarange on 20th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.