‘ओबीसीं’साठी आता वंचित मैदानात; राज्यभर काढणार 'आरक्षण बचाव संवाद यात्रा'
By विजय सरवदे | Published: July 11, 2024 12:31 PM2024-07-11T12:31:38+5:302024-07-11T12:33:27+5:30
वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; प्रकाश आंबेडकरांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश
छत्रपती संभाजीनगर : सगेसोयऱ्याचे राजकारण आणि मराठा आरक्षणामुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘ओबीसी आरक्षण बचाव संवाद यात्रा’ काढून ओबीसींच्या मनातील भीती दूर करण्याचे प्रयत्न करा, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांनी संवाद यात्रेचे नियोजन सुरू केले आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर शहरात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन आणि प्रभाकर बकले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की, राजकीय व अराजकीय ओबीसींच्या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात ‘ओबीसी आरक्षण बचाव संवाद यात्रा’ काढावी. त्यात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता गरीब मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी रद्द करावी, या मागण्या घेऊन जिल्ह्यातील १२४ पंचायतीस्तरावर सभा-मेळावे घ्यावेत. या माध्यमातून मराठा आरक्षणामुळे ओबीसीमध्ये पसरलेली अस्वस्थता दूर करावी. हा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जाणार आहे.
यासंदर्भात योगेश बन यांनी सांगितले की, १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील ओबीसींचे नेते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून साधारणपणे १८ ते २० जुलैपर्यंत या संवाद यात्रेला सुरुवात केली जाईल. यापैकी ६४ पंचायत समित्या माझ्याकडे, तर ६० पंचायत समित्यांची जबाबदारी बकले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याप्रसंगी अमित भुईगळ, मराठवाडा सचिव तथा राज्य प्रवक्ते तय्यब जफर, मराठवाडा संघटक महेश निनाळे, मिलिंद बोर्डे, मनपा विरोधी पक्षनेता अफसर खान, पंकज बनसोडे, जलीस अहमद, रामदास वाघमारे, रूपचंद गाडेकर, प्रवीण जाधव, रवी रत्नपारखे, शाहीर मेघानंद जाधव, रोहन गवई, पंडितराव तुपे, अंजन साळवे, वैशाली राणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा कानोसा
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आंबेडकर यांनी ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. याशिवाय, जिल्ह्यातील सर्वच ९ विधानसभा मतदारसंघांतील परिस्थितीचा आढावा घेतला.