‘आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांचा बदला घ्यायचाय’; बच्चू कडूंनी सांगितला 'महाशक्ती'चा उद्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:33 PM2024-09-27T13:33:39+5:302024-09-27T13:35:01+5:30
संभाजी राजे भोसले, राजू शेट्टी, शंकरअण्णा धोंडगे यांनी केले मार्गदर्शन; संत एकनाथ रंगमंदिर हाउसफुल्ल, विचारमंचाला अर्पण केला मोठा पुष्पहार
छत्रपती संभाजीनगर :‘गरीब गरीब होतोय, श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत. ही व्यवस्था बदलून टाकायचीय. ७५ वर्षांत शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न न सोडवणाऱ्या व आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांचा बदला घ्यायचाय’ अशा शब्दांत परिवर्तन महाशक्तीचा उद्देश गुरुवारी आमदार बच्चू कडू यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्पष्ट केला.
परिवर्तन महाशक्तीच्या या पहिल्याच मेळाव्यास तब्बल चाळीस सहभागी छोट्या-मोठ्या पक्ष संघटनांच्या उपस्थितीने संत एकनाथ रंग मंदिर हाउसफुल्ल झाले होते. खालच्या व वरच्या खुर्च्या भरून गेल्याने कार्यकर्त्यांना खाली जमिनीवर बसून नेत्यांची भाषणे ऐकावी लागली. शेवटी झालेले बच्चू कडू यांचे भाषण चांगलेच रंगले. एका कार्यकर्त्याने तर ते बाल्कनीतून ऐकून ‘बच्चू कडू ... आय लव्ह यू’ असे म्हटले. आणि सभागृहात हशा पिकला.
कडू म्हणाले, दोन्ही आघाड्या मजबूत आहेत. कदाचित ते एकेका मतदारसंघात शंभर कोटी रुपयेही खर्च करू शकतील. आम्ही तिसरे आहोत. म्हणजे पैसे खाणारे, कुणाला तर पाडायला उभे आहोत, हा अपप्रचार होय. आतापर्यंत सतरंजी उचलणारा कार्यकर्ताच नेत्यांचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. ( टाळ्या)
स्वामिनाथन आयोगाची एकही शिफारस लागू होत नाही. अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू कधीही सामान्य माणूस असत नाही अशी टिकेची झोड उठवत बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही टोला मारला. ‘यांना सांगावं लागतं की, बहिणींनो मी तुमचा लाडका भाऊ, एकनाथ भाऊ, देवा भाऊ. अजितदादा तर म्हणतात की, मीच पैसे उपलब्ध करून दिले. पण मी सांगतो, या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ आपण आहोत. परिवर्तन महाशक्तीवाले. ( टाळ्याच टाळ्या)
जय जवान जय किसान पार्टीचे नेते नारायण अंकुशे, जय विदर्भ पार्टीचे अरुण केदार, योगेश माकणे (पुणे), राजेंद्र कापरे (बीड), ॲड. धोंडिबा पवार, राधाकृष्ण भास्कर आदींची नेते येण्यापूर्वी भाषणे झाली. कोणत्याही नेत्याचे स्वागत यावेळी करण्यात आले नाही. एक भला मोठा पुष्पहार विचारमंचाला अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन व तिरंगा ध्वजवंदन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. नंतर नेत्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले. अप्पासाहेब कुढेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. धनंजय जाधव यांनी प्रास्ताविक केले.
‘महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो’ अशी घोषणा दिली जात असतानाच संभाजीराजांनी ती रोखली व असल्या घोषणा देऊ नका असे बजावले. ‘सोडा परंपरागत पक्षांची भक्ती, आता निवडू परिवर्तन महाशक्ती’ अशी टॅगलाइन फलकावर झळकत होती.
महाराष्ट्रात जे घडत आहे ते कुणालाच पटणारे नाही, अशी टीका शंकरअण्णा धोंडगे यांनी केली. ‘आपला भिडू ... बच्चू कडू’ असा उल्लेख वामनराव चटप यांनी केला. इकडेही चोर आहेत, तिकडेही चोर आहेत. या चोरांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, असेही ते म्हणाले.
अबकी बार परिवर्तन महाशक्ती सरकार असा नारा त्यांनी दिला. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे पोटतिडकीने मांडले. आता लवकरच बाजारात येणाऱ्या मका पिकाचेही ही मंडळी वाटोळे करून टाकतील, असा आरोप त्यांनी केला.
राजू शेट्टीचे पाकीट मारले...
मेळाव्याकडे येताना राजू शेट्टी यांचे पाकीट मारले गेले. त्यांचे भाषण संपल्यानंतर एका कार्यकर्त्याने महाशक्तीला पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्याचा स्वीकार करताना शेट्टी म्हणाले, माझं पाकीट मारल्याने माझ्याकडे पैसे नव्हते. आता हे पैसे मला खर्चायला झाले. (हंशा)
आपण डार्क हॉर्स....
छत्रपती संभाजी राजे यांचेही भाषण रंगले. महाशक्ती म्हणजे डार्क हाॅर्स असून ब्रुद्रुक आणि खुर्दच्या राजकारणाला कंटाळून एक समर्थ पर्याय देण्यासाठी स्वच्छ मनाने आम्ही एकत्रित आलो आहोत असे ते म्हणाले. माझ्यावर या सर्व नेत्यांना एकत्रित ठेवण्याची जबाबदारी आहे, असेही त्यांनी जाहीर करून टाकले.