तंबाखू, गुटखा खाताय? मग गाल कापण्याची ठेवा तयारी, रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक
By संतोष हिरेमठ | Published: May 30, 2023 07:41 PM2023-05-30T19:41:37+5:302023-05-30T19:42:04+5:30
रोज २ मुख कर्करोगाच्या शस्त्रक्रिया; ओठापासून तर पोटापर्यंतच्या अवयवांना कॅन्सरची लागण
छत्रपती संभाजीनगर : तुम्ही जर तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खात असाल, सिगारेट ओढत असाल तर गाल, जीभ, ओठ कापण्याची तयारी ठेवा. कारण हे पदार्थ खाल्ल्याने मुखकर्करोगाचा धोका सहापटीने वाढतो. छत्रपती संभाजीनगरातील एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात दररोज एक ते दोन रुग्णांची मुखकर्करोगाची शस्त्रक्रिया होत आहे. दीड वर्षात चारशेवर रुग्णांच्या मुखकर्करोग शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करीत असाल तर वेळीच सावधान झालेले बरे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
शरीरातील इतर भागाच्या कर्करोगाच्या निदानासाठी जशी अद्ययावत व महागडी उपकरणे लागतात, तशी तोंडातील कर्करोगाच्या निदानासाठी लागत नाही. कारण तोंडाच्या कर्करोगाची पूर्वावस्था, कर्करोगाची सुरुवात लगेच ओळखता येते. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे ओठापासून तर पोटापर्यंतच्या अवयवांना कर्करोग आढळून येत आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मुखकर्करोगाच्या किती शस्त्रक्रिया?
वर्ष - संख्या
२०२२- ३४५
२०२३- १३० (आतापर्यंत)
तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे
- गिळताना वेदना, त्रास होणे.
- दीर्घकालीन आवाजातील बदल.
- मानेमध्ये गाठ येणे.
- प्राथमिक अवस्थेत निदान करण्यासाठी मुखाचे महिन्यातून परीक्षण करावे.
- वर्षातून एकदा दंतचिकित्सकांकडून तोंडाचे परीक्षण करून घ्यावे.
मुखकर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक
पुरुषांमध्ये तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखकर्करोगाचे प्रमाण हे सर्वाधिक जास्त आहे. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने ओठापासून तर पोटापर्यंतच्या अवयवांचा कर्करोगाचा धोका वाढतो.
- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय
१८ वर्षांच्या तरुणाचीही शस्त्रक्रिया
तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाला वृद्धापकाळ लागत नाही. ४० वर्षांखालील व्यक्तींमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक आढळत आहे. तरुणांमध्येही मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. अगदी १८ वर्षांच्या तरुणावरही शस्त्रक्रिया झाली.
- डाॅ. अजय बोराळकर, प्राध्यापक, कर्करोग शल्यचिकित्साशास्त्र विभाग
२५ टक्के रुग्ण मुखकर्करोगाचे
शस्त्रक्रिया होणारे २५ टक्के रुग्ण हे मुखकर्करोगाचे आहेत. तोंड, अन्ननलिका, श्वसन यंत्रणा, फुप्फुस आदी अवयवांचा कर्करोग हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो.
- डाॅ. मनोज मोरे, सहायक प्राध्यापक, कर्करोग शल्यचिकित्साशास्त्र
कमी वयातील रुग्ण
तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांमुळे मुखकर्करोगासह फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अगदी तिशीतील तरुणांमध्येही मुखकर्करोग आढळत आहे.
- डाॅ. वसंत पवार, हेड, नेक सर्जरी विभाग