नमकीनच्या पुड्यात तंबाखू, पानमसाला
By Admin | Published: September 11, 2014 01:22 AM2014-09-11T01:22:32+5:302014-09-11T01:23:14+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गुजरातहून नकली खवा, गुटखाच नव्हे तर सुगंधी तंबाखूही अवैधरीत्या आणली जात आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गुजरातहून नकली खवा, गुटखाच नव्हे तर सुगंधी तंबाखूही अवैधरीत्या आणली जात आहे. रविवारी ७ रोजी ७ लाख १२ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केल्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा १ लाख ५ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू
जप्त करण्यात आली. मागील चार दिवसांत ८ लाख १७ हजार रुपयांची तंबाखू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे राज्यात गुटखा, पानमसाल्यासोबतच सुगंधी तंबाखू विक्रीवरही बंदी आहे.
बुधवारी १० रोजी शहरात सुगंधी तंबाखू येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद शहा यांना मिळाली होती. त्यानुसार सकाळी ९ वाजेपासून दौलताबाद टी-पॉइंटवर अन्न व औषध प्रशासनाचे पथक तयार होते. गुजरातहून आलेली पंजाब ट्रॅव्हलची गाडी या पथकाच्या नजरेस पडली. पथकाने त्या गाडीचा पाठलाग केला. शहरात येताच हा माल उतरविण्यात आला. त्यावेळीस शेख फईम शेख इब्राहीम (रा. नवाबपुरा) हा इसम तो माल घेण्यासाठी येताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. नमकीन असे लिहिलेल्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये एक-एक किलोची सुगंधी तंबाखूची ३० पाकिटे ठेवण्यात आली होती.
यासंदर्भात अन्नसुरक्षा अधिकारी गजानन मोरे यांनी सांगितले की तंबाखू, चांदीचे वर्क, मसाले व सुगंधी पदार्थ मिक्स करूनही सुगंधी तंबाखू तयार करण्यात आली आहे, अशी सुगंधी तंबाखू विक्रीला राज्यात बंदी आहे. तपासणीत अन्नसुरक्षा अधिकारी अमर सोनटक्के यांचेही सहकार्य लाभले. क्रांतीचौक पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नारेगावातील डंपिंग ग्राऊंडमध्ये तंबाखू गुटखा नष्ट करणार
मागील चार दिवसांत जप्त करण्यात आलेली ८ लाख १७ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व ११ लाख ६१ हजार रुपये किमतीचा गुटखा नारेगाव येथील डंपिंग ग्राऊंड येथे नष्ट करण्यात येणार आहे.
प्रथम तंबाखू व गुटखा मातीत मिसळण्यात येणार आहे. जेसीबीच्या साह्याने मोठे खड्डे करण्यात येऊन
त्यात ते टाकून देण्यात येणार आहेत. जप्त करण्यात आलेला खवाही अशाच पद्धतीने नष्ट करण्यात आला आहे.