आजपासून जिल्ह्यातील ६१६ दारू दुकाने बंद
By Admin | Published: April 1, 2017 12:14 AM2017-04-01T00:14:27+5:302017-04-01T00:16:33+5:30
लातूरराष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दारू दुकाने बंद होणार की नाही यावर महिनाभरापासून गुऱ्हाळ सुरू होते़
हरी मोकाशे लातूर
राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दारू दुकाने बंद होणार की नाही यावर महिनाभरापासून गुऱ्हाळ सुरू होते़ मात्र शुक्रवारी रात्री अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही दारू दुकाने शनिवारपासून बंद करावीत, असे आदेश दिले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील ६१६ दारू दुकानांचे कुलूप शनिवारी निघणार नाही़
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ५०० मिटर अंतराच्या आतील दुकाने बंद करण्याच्या हालचाली मार्चच्या सुरूवातीपासून सुरू झाल्या होत्या़ दरम्यान, लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदणी असलेल्या ६६४ पैकी ६१३ बार, परमिट रूम, देशी दारू दुकान क्लबला नोटिसा बजावल्या होत्या़ त्यामुळे १ एप्रिलपासून ही दारू दुकाने बंद होणार असे गृहित धरले जात होते़
दरम्यान, राज्य सरकारने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमिट रूम्स सुरू राहतील, असे स्पष्ट करीत नूतनीकरण करून घेण्याचे आदेश दिले होते़ त्यामुळे दारू दुकानदारांना दिलासा मिळाला़ परिणामी, लातुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे नूतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास सुरूवात केली होती़ त्यातील काही प्रस्तावांचे नूतनीकरणही झाले आहे़
शुक्रवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त संजीवकुमार यांनी राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ५०० मिटर अंतराच्या आतील दारू दुकाने १ एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता जिल्ह्यातील ६६४ पैकी ६१६ दारू दुकाने कायमस्वरूपी बंद होणार आहेत़