आज औरंगाबाद महामॅरेथॉनचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:39 PM2017-12-16T23:39:33+5:302017-12-16T23:39:52+5:30
लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या थरारास गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथून उद्या, रविवारी भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे.
औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या थरारास गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथून उद्या, रविवारी भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण देशभरातून आणि परदेशातील असे साडेसात हजार धावपटू उद्या धावणार आहेत. यंदा संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष दलातील धावपटूंना विशेष बक्षीस दिले जाणार आहे. गतवर्षी या महामॅरेथॉनमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवला होता. यंदा मात्र साडेसात हजारांपेक्षा विक्रमी सहभाग असणार आहे.
महामॅरेथॉनला सकाळी ६ वाजता २१ कि. मी. अंतराच्या अर्धमॅरेथॉनने सुरुवात होणार आहे. १0 कि. मी. अंतराची मॅरेथॉन सकाळी ६.१५ आणि ५ व ३ कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनला सकाळी ७ व ७.१0 वाजता सुरुवात होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि अभिनेता देवदत्त नागे यांची उपस्थिती हे आकर्षण ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्यास महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे, पोलीस उपआयुक्त दीपाली घाडगे, पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. शिवकांत बाजपेयी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बक्षिसांचे वितरण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाठ, आ. सतीश चव्हाण, आ. अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९.३0 वाजता होणार आहे.