देगलुरात आज दुष्काळ निवारण परिषद
By Admin | Published: February 17, 2016 11:39 PM2016-02-17T23:39:08+5:302016-02-17T23:46:39+5:30
देगलूर : शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अग्रेसर असलेल्या ‘विश्व परिवार’ या संस्थेकडून १८ फेब्रुवारी रोजी देगलुरात दुष्काळ निवारण परिषद घेण्यात येत आहे.
देगलूर : मागील पाच वर्षांपासून देगलूर शहर व परिसरात सामाजिक प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अग्रेसर असलेल्या ‘विश्व परिवार’ या संस्थेकडून १८ फेब्रुवारी रोजी देगलुरात दुष्काळ निवारण परिषद घेण्यात येत आहे.
पर्यावरणातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा, त्यामुळे मागील दोन तीन वर्षात मराठवाड्यात झालेली नापिकी, त्यातून दैनंदिन कोठे ना कोठे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूगर्भातील खालावत जात असलेली पाण्याची पातळी या विषयावर विचारमंथन होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा (राजस्थान) यांचे ‘नदी-नाले व शेतीचे पुनरूज्जीवन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, पद्मश्री डॉ. विखे पाटील, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर, यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीतील निवृत्त प्रपाठक डॉ. सुमंत पांडे यांच्यासह अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. येथील विठ्ठलरेड्डी गिरणी मैदानावर या संबंधीची तयारी चालू आहे. (वार्ताहर)