आज इमोजी डे: इमोजीचा इतिहास, वापर, गैरवापर आणि कायदेशीर लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:56 AM2023-07-17T05:56:01+5:302023-07-17T05:56:27+5:30
मजेशीर इमोजीचा वापर! गैरवापर आणि कायदेशीर लढाई
डॉ. खुशालचंद बाहेती
छत्रपती संभाजीनगर : इमोजी शब्दाचे मूळ जपानी भाषेत आहे. याचा अर्थ ‘चित्र वर्ण अक्षर’. इमोजीमुळे संवाद विश्वात क्रांती घडत आहे. भावना व्यक्त करण्याचा शक्तिशाली मार्ग म्हणूनच इमोजी लोकप्रिय होत आहेत. परंतु, इमोजीच्या वापरातून प्रसंगी गैरसमजातून वाद निर्माण झाल्याची उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे इमोजीचा वापर मजेशीर, गमतीदार असला, तरी प्रसंगी कायदेशीर खटले दाखल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
१०० कोटी दररोजचा इमोजींचा वापर
३,८०० युनिकोडवर एकूण इमोजी
वर्षभरात २.३ ट्रिलियन मेसेजमध्ये इमोजींचा वापर
सर्वाधिक लोकप्रिय इमोजी डोळ्यांतून अश्रू काढत हसणारा चेहरा हृदयाची इमोजी
ऑक्सफर्ड डिक्शनरीत इमोजीचा अर्थ ‘इलेक्ट्रॉनिक संवादात वापरण्यात येणारे, भावना दर्शविणारे छोटे डिजिटल चित्र’ असा मांडण्यात आला आहे.
इमोजींच्या नेमक्या अर्थाबाबत अस्पष्टता
इमोजीचा नेमका अर्थ काय याचे कोणतेही नियम नाहीत. उघड्या तोंडाच्या चेहऱ्याची इमोजी काही जणांना हसणारी वाटते, तर काहींना आश्चर्य व्यक्त करणारी. इमोजीत चेहऱ्यावर असणारा पाण्याचा थेंब काही जण अश्रू समजतात, तर काही जण थकवा.
सतर्कतेने वापरच योग्य!
n इमोजीच्या वापरातील आणखी एक कायदेशीर कारवाईचा धोका आहे. काही संगणक कंपन्यांनी इमोजीवर कॉपीराइट, तर काहींनी ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे हक्क मिळवले आहेत.
n भविष्यात इमोजी वापरावरून बौद्धिक मालमत्ता कायद्याचे खटले सुरू झाले, तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. इमोजीचा वापर मजेशीर असला तरी सतर्कतेने करणे हेच योग्य...
गमतीसह गैरसमजही
इमोजीचा वापर मजेशीर असला तरी त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. करार बंधनकारक करणे, लैंगिक छळासाठी जबाबदार ठरवणे, अपमान, मानहानी अशा कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. इमोजीवरून या पूर्वीही न्यायालयात खटले चालवले गेले आहेत.
९२% सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांकडून इमोजी वापर
६०% चेहऱ्यांच्या इमोजींचा वापर सर्वाधिक
इमोजीचा इतिहास
भाषेला चित्रांचा पर्याय देण्याचे सर्वप्रथम विचार १९६० मध्ये रशियन प्राध्यापक ब्लादमीर नाबोकोव यांनी मांडला. हसण्याला चिन्ह असले पाहिजे हा विचार त्यांनी मांडला.
१९८२ मध्ये संगणकशास्त्रज्ञ स्कॉट फहीमन यांनी भाषेऐवजी संगणकातील :-) व (:- या चिन्हांचा उपयोग आनंद व दु:ख दर्शविण्यासाठी करण्याची सूचना केली.
फहीमन यांनी संगणकावरील वर्णाक्षरे आणि चिन्हांचा उपयोग करून याचा उपयोग लिखाणातील भावना व्यक्त करण्यासाठी सुरू केला. याला इमोटिकॉन (Emoticon - Emotion Icon) म्हणून मान्यता मिळाली.
इमोजी खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली २००० नंतर. स्मार्ट फोनमध्ये इमोजीचा वापर या काळात सुरू झाला.
२००७ ते २०१४ या काळात अनेक मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना वेगवेगळ्या इमोजी उपलब्ध करून दिल्या व त्याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला.