आज ‘खुल जा सिमसिम’
By Admin | Published: August 6, 2015 12:21 AM2015-08-06T00:21:24+5:302015-08-06T01:01:52+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी ४ आॅगस्ट रोजी ८२ टक्के मतदान पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी गुरुवार,
औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी ४ आॅगस्ट रोजी ८२ टक्के मतदान पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी गुरुवार, ६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ७९ उमेदवारांची धकधक बुधवारी पाहावयास मिळाली. सुमारे ५ हजार मतदान यंत्रे आणि १ हजार ९४४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. २५० निवडणूक निर्णय अधिकारी, २८० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १५१ क्षेत्रीय निवडणूक अधिकारी, २ हजार ७४ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती प्रशासनाने केली आहे. सुमारे ८ हजार ७८ कर्मचारी या मतदान प्रक्रियेत आहेत. २७०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफाही बंदोबस्तासाठी देण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याकडे औरंगाबाद, पैठण, अशोक खरात यांच्याकडे फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. केंद्रे यांच्याकडे कन्नड, खुलताबाद तर आर. के. ढवळे यांच्याकडे गंगापूर, वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची निरीक्षक म्हणून जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला संनियंत्रक अधिकारी आहेत. गंगापूरमध्ये ६५ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होईल. एकूण १५ फेऱ्यांत ही मोजणी होणार आहे, अशी माहिती तहसीलदार दिनेश झांपले यांनी दिली. पैठण तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी १६ टेबल लावण्यात आले असून १९ फेऱ्या होणार आहेत. यासाठी ६८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, असे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाचवेळी सर्व ग्रा.पं. वार्डांची मतमोजणी करण्यात येणार आहे, असे तहसीलदार महेश सुधळकर यांनी सांगितले. सिल्लोड तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी १४ टेबल लावण्यात आले असून १९ फेऱ्या होणार असल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले. सोयगाव तहसीलचे नियोजन पूर्ण झाले असून मतमोजणी शहराबाहेर तीन कि़मी.वर असलेल्या जंगला गावात आयटीआय कॉलेजच्या इमारतीत होणार आहे, असे तहसीलदार नरसिंग सोनवणे यांनी सांगितले. याशिवाय खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर व औरंगाबाद तहसील कार्यालयानेही योग्य नियोजन करून मतमोजणीची तयारी केली आहे. उमेदवारांसह मतदारांच्याही नजरा मतमोजणीकडे लागल्या आहेत.