आज ‘लोकमत’ सूरोत्सव; दिवाळीच्या पूर्वसंध्येला महेश काळेंची संगीत मैफल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 04:40 PM2022-10-21T16:40:00+5:302022-10-21T16:40:28+5:30
केवळ निमंत्रित आणि पासधारकांसाठी असलेल्या या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’तर्फे चार दिवसांपासून मोफत पास वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी येताना सोबत पास घेऊन येणे आवश्यक आहे.
औरंगाबाद : शहरवासीयांसाठी सतत विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘लोकमत’तर्फे दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सूरांच्या मैफलीचे आयेाजन करण्यात आले आहे. ख्यातनाम गायक महेश काळे यांच्या जादूई आवाजांची संगीत मैफल आज, शुक्रवारी सायंकाळी ‘लोकमत भवन’ येथे रंगणार आहे. खास निमंत्रित आणि पासधारकांसाठी होत असलेल्या या कार्यक्रमाची शहरवासीयांना उत्सुकता आहे.
दरवर्षी दिवाळीनिमित्त ‘लोकमत’तर्फे विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरवासीयांच्या यंदाच्या दिवाळीची सुरुवात संगीतमय व्हावी, यासाठी ‘लाेकमत’च्या वतीने दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमत भवन येथे ख्यातनाम गायक महेश काळेंच्या सूरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत मांदियाळीबद्दल रसिक श्रोत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
केवळ निमंत्रित आणि पासधारकांसाठी असलेल्या या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’तर्फे चार दिवसांपासून मोफत पास वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी येताना सोबत पास घेऊन येणे आवश्यक आहे. सर्वसामान्य रसिक श्रोत्यांना लोकमत भवनच्या मागील बाजूला असलेल्या गेटमधून प्रवेश दिला जाईल, तर व्हीआयपींना मुख्य गेटने प्रवेश असेल. या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’चे रिगल लॉन, जालना रोडवरील शिवा ट्रस्टची जागा (इंडियन एअरलाईनचे जुने कार्यालय) आणि एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानालगत वाहनतळाची व्यवस्था केली आहे.
पार्किंगची व्यवस्था तीन ठिकाणी
एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानालगत, जालना रोडवरील शिवा ट्रस्टच्या जागेवर (एअर इंडियाचे जुने कार्यालय) आणि ‘लोकमत’च्या रिगल लॉन अशा तीन ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
केवळ पासधारकांनाच प्रवेश
लोकमत दिवाळी सूरोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केवळ निमंत्रित आणि पासधारकांसाठीच आहे. यामुळे या कार्यक्रमास केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पावसाचा अंदाज पाहता श्रोत्यांनी सोबत छत्री आणावी.
दिवाळीचा आनंद द्विगुणित
‘लोकमत’ नेहमीच समाजोपयोगी नवनवीन कार्यक्रम घेत असतो. या वर्षी औरंगाबादकरांसाठी ‘लोकमत’ची अनोखी दिवाळी भेट गायक महेश काळे यांच्यासोबत रंगणार आहे. दिवाळी सूरोत्सव म्हणजे औरंगाबादकरांसाठी संगीताची मांदियाळी असून, या कार्यक्रमासाठी संगीतप्रेमींनी उपस्थित राहून या वर्षीच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. या कार्यक्रमासाठी आम्ही ‘लोकमत’सोबत जोडल्याचा आनंद आहे.
- महेंद्र बंब, दीप ट्रेडर्स (प्रीमियम ड्रायफ्रुट स्टोअर)