आजपासून अशंत: लॉकडाऊन; कारवाईस विरोध केला तर सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:46 PM2021-03-11T12:46:47+5:302021-03-11T12:47:09+5:30
Partial Lockdown in Aurangabad : अशंत: लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अॅक्शन प्लॅन तयार
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे घोषित ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंतच्या अंशत: लॉकडाऊनची अंमलबजावणी गुरूवारपासून सुरू होईल. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या सवलतीच्या काळात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या कारवाईत पथकातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून शिवीगाळ, मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा बुधवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला.
पोलीस, महसूल, मनपा कर्मचाऱ्यांपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे विशेष अधिकार जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले सर्व नियम कटाक्षाने पाळा. विनामास्क फिरू नका, गर्दी करू नका, सोशल डिस्टंन्सिंग पाळा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या बैठकीनंतर लॉकडाऊनच्या काळात कारवायांसाठी जबाबदारीसह अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला.
अधीक्षक कृषी अधिकारी खतांच्या दुकानांवर लक्ष ठेवतील. सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन, कामगार उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागावर दक्षतेची जबाबदारी दिली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांवर भाजीमंडईवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रात्री ९ वाजेनंतर हॉटेल, ढाबे सुरू दिसले तर उत्पादन शुल्क विभाग त्या आस्थापनेला सील करण्याची कारवाई करतील. कुणी हुज्जत घातली तर लायसन्सधारकावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
२० विभागांवर दिली जबाबदारी
पोलीस, मनपा, महावितरण, जिल्हा परिषद, घाटी, कृषी विभाग, एफडीए, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग, आरटीओ, जिल्हा उपनिबंधक, कामगार उपायुक्त, एमटीडीसी उपसंचालक, एमआयडीसी आरओ, वजनमापे सहायक नियंत्रक आदी विभागांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
ट्रिपल सिट दुचाकीस्वारांचे लायसन्स जप्ती
दुचाकीवरून ट्रिपल सिट विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे लायसन्स जप्त केले जाईल. यासाठी आरटीओ विभागासह महसूल, पोलीस पथकांना अधिकार देण्यात आले आहेत.
जास्त प्रवासी असलेल्या रिक्षांची जप्ती
जिल्ह्यातून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास, विनामास्क फिरल्यास लायसन्स जप्ती केली जाईल. रिक्षांमध्ये वाहतूक करताना विनामास्क जास्तीचे प्रवासी असतील तर रिक्षांची जप्ती केली जाईल. यासाठी आरटीओंवर जबाबदारी देण्यात आली आहे.
एस.टी.मध्ये विनामास्क प्रवास नाही
एस.टी.महामंडळांवर प्रवासासाठी बंधने नाहीत. विनामास्क प्रवासी एस.टी.मध्ये बसून घेऊ नयेत. यासाठी वाहक आणि चालकांनीदेखील तसे संबंधित प्रवाशांना सांगावे लागणार आहे. विभागीय नियंत्रकांना याबाबत सूचना केल्या आहेत.
आरटीपीसीआर नसेल तर अॅन्टीजेन करा
आस्थापनांना कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे जमत नसेल तर किमान अॅन्टीजेन टेस्ट करावी. जर त्यामध्ये हयगय केली तर संबंधित आस्थापनेला सील करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
भाजीमंडईचे अलगीकरण करण्याच्या सूचना
भाजीमंडईचे अलगीकरण करण्याच्या सूचना कृउबाला केल्या आहेत. गर्दी नियंत्रणाबाबत व्यवस्थापन कसे करणार, याचा प्रस्ताव त्यांनी जिल्हा टास्क फोर्सला दिला आणि तो योग्य वाटला तर भाजीमंडईला परवानगी देण्याचा विचार होईल. परंतु, गुरुवारी जाधववाडी भाजीमंडई बंदच राहील.