आज सभापती निवडी

By Admin | Published: April 1, 2017 12:09 AM2017-04-01T00:09:12+5:302017-04-01T00:12:35+5:30

कोणाला सभापतीपदाची लॉटरी लागते व कोणाला ‘एप्रिल फुल’ मिळते ? याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या असून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Today the presidential elections | आज सभापती निवडी

आज सभापती निवडी

googlenewsNext

बीड : जिल्हा परिषदेत दुसऱ्या स्थानी असलेल्या भाजपने माजी मंत्री सुरेश धस यांना गळाला लावून राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी धोबीपछाड देत सत्ता काबिज केल्यानंतर शनिवारी विषय समित्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडत आहे. कोणाला सभापतीपदाची लॉटरी लागते व कोणाला ‘एप्रिल फुल’ मिळते ? याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या असून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
६० सदस्यीय जि. प. मध्ये भाजपने हक्काचे २०, धस गटाचे पाच, काँग्रेस एक, शिवसंग्राम व शिवसेना प्रत्येकी चार असे एकूण ३४ सदस्यांचे संख्याबळ तयार करुन राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. १४ मार्च रोजी अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार तर उपाध्यक्षपदी शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदाचा फायदा उचलून सत्ता प्राप्त केल्यानंतर सभापतीपदांच्या निवडीतही युतीच सरस राहणार आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजता सभापतीपदांसाठी नामनिर्देशनपत्रे मागविली जाणार आहेत. दुपारी दोन वाजता सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीत जि. प. च्या विशेष सर्वसाधारण सभेला प्रारंभ होणार आहे. सभेमध्येच नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्यासाठी अर्ध्या तासाचा अवधी दिला जाणार आहे. त्यानंतर गरज भासल्यास हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कृषी व पशुसंवर्धन, अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या पाच समित्यांसाठी कारभारी निवडले जाणार आहेत. उपाध्यक्षांकडे एका समितीची धुरा हमखासच जाणार आहे. त्यामुळे चार सदस्यांना सभापतीपदी संधी मिळणार आहे.
याआधी उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम समिती असायची. मात्र, अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या आशा दौंड यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडील अर्थ व बांधकाम खाते काढून कृषी व पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे हाच नियम युतीच्या काळातही कायम राहिला तर उपाध्यक्षा जयश्री मस्के यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खाते येईल. मात्र, जयश्री मस्के यांनी हे खाते स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यांनी वजनदार खात्यावर दावा केला आहे. उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असूनही आ. लक्ष्मण पवार यांनी विरोध केल्याने ऐनवेळी माघार घ्यावी लागलेल्या शिवसेनेच्या युद्धजित पंडित यांनी अर्थ व बांधकाम खात्यासाठी जोर लावला आहे. शिक्षण व आरोग्य खात्यावर अनेकांचा डोळा आहे. धस गटाला संधी मिळालीच तर अ‍ॅड. प्रकाश कवठेकर किंवा अश्विनी जरांगे यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. महिला-बालकल्याण खात्यासाठी भाजपच्या डॉ. योगिनी थोरात यांचे नाव पुढे आले आहे. समाजकल्याण समितीसाठी संतोष हंगे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री सुरेश धस, बदामराव पंडित, आ. विनायक मेटे ही मंडळी कोणाच्या नावाला पसंती देतात? यावर सभापतीपद अवलंबून असेल. इच्छुकांनी १५ दिवसांत जोरदार ‘लॉबिंग’ केलेले आहे. १ एप्रिलच्या मुहूर्तावर निवडी होत असल्याने युतीचे नेते कोणाला संधी देतात व कोणाला ‘एप्रिल फूल’ करतात ? हे पाहणे रोमांचक ठरेल. (प्रतिनिधी)

Web Title: Today the presidential elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.