आजपासून ‘आॅन दी स्पॉट’ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:08 AM2017-08-21T01:08:20+5:302017-08-21T01:08:20+5:30
यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार फज्जा उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार फज्जा उडाला आहे. आतापर्यंत चार प्रवेश फेºया राबविल्यानंतरही ९ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांसाठी उद्या सोमवारपासून ‘प्रथम येणाºयास प्रथम प्रवेश’ ही फेरी राबविण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयनिहाय प्रवेशांच्या रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
औरंगाबादेत यंदा पहिल्यांदाच जूनपासून केंद्रीय पद्धतीने अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशाच्या आतापर्यंत चार फेºया राबविण्यात आल्या. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्यामुळे पाचवी विशेष फेरी राबविण्यात आली. तरीदेखील ९ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने उद्या २१ ते २८ आॅगस्टदरम्यान ‘प्रथम येणारास प्रथम प्रवेश’ ही फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांचे गुणवत्तेनुसार तीन गट करण्यात आले आहेत. गट क्रमांक १ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ८० ते १०० टक्के गुण मिळाले आहेत. गट क्रमांक २ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ६० ते १०० टक्के गुण मिळाले आहेत आणि गट क्रमांक ३ मध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पहिल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी रविवारी रिक्त जागांची यादी जाहीर झाली. त्यानंतर उद्या २१ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आॅनलाइन अर्ज क्रमांक दोन भरायचा आहे. हा अर्ज भरून झाल्यावर २१, २२ आॅगस्टला विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. या गटातील विद्यार्थ्यांना २२ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. २२ आॅगस्ट रोजी गट क्रमांक २ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. २३ आॅगस्टपर्यंत या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. २४ आॅगस्ट रोजी गट क्रमांक ३ साठी रिक्त जागा जाहीर केल्या जातील. २६ आॅगस्ट रोजी या गटातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप होईल व ते विद्यार्थी २८ आॅगस्ट रोजी प्रवेश घेतील.