आजच्या काळात संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:52 AM2017-11-14T00:52:17+5:302017-11-14T00:52:24+5:30
वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. राजेश सेठिया म्हणाले की, जगभरात १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा कला जातो. मधुमहाबाबत जनजागृती करण्यासाठी
दरवर्षी एक कल्पना वर्षभर राबविली जाते. यंदा ‘मधुमेह आणि स्त्री’ ही थीम घेण्यात आली आहे. जगभरात ९ कोटी महिलांना मधुमेह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासह त्यांना अधिक सजग करण्याचे उद्दिष्ट जागतिक मधुमेह फेडरेशनचे आगामी वर्षभर राहणार आहे. तसेच आरोग्यदायी भविष्य आमचा अधिकार हे ब्रीद घेऊन या आजाराबाबत सर्वसामान्यांमध्ये पुढील वर्षभर जनजागृती केली जाणार आहे.
महाराष्ट्रात मधुमेहाचे ६० लाख रुग्ण असून, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे अनेक समस्या उद्भवत असून, त्यातूनच ताणतणाव वाढत आहेत. ताणतणावांमुळे मानवी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यांचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच मधुमेहासारखा आजार जडतो. या आजारातून पुढे हृदयरोग, अर्धांगवायू, लैंगिक दुर्बलता यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेहाचा संबंध थेट बदलत्या जीवनशैलीशी असून, चांगल्या जीवनशैलीबाबत शहरी भागासह ग्रामीण भागात जनजागृतीची गरज आहे. मधुमेहाच्या आजाराबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यामुळे धोकादायक पातळीवर आल्यानंतर प्रामुख्याने त्यावर उपचार केले जातात. तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल संस्कृतीमुळे तरुणांचेही व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. मैदानी खेळांसह योगासन व इतर प्रकारचे व्यायाम निरोगी शरीरासाठी केव्हाही चांगलेच. त्यासाठी तरुणांसह महिलांनीही व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच व्यसनापासून दूर राहिले, तर कुठलाही आजार होणार नाही.
चंदीगड मधुमेहाची राजधानी
चंदीगड ही मधुमेह आजाराची राजधानी झाली असून, १३. ५ टक्के लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे. तर १४. ५ टक्के मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्र हा दुस-या क्रमांकावर असून, १३ टक्के लोकांना मधुमेह आजार जडलेला आहे. तर त्यापेक्षा अधिक लोक हे याच्या उंबरठ्यावर आहेत. याचे गांभीर्य ओळखून याबाबत जनजागृतीची गरज डॉ. सेठिया यांनी व्यक्त केली आहे.