विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:15 AM2018-05-15T01:15:56+5:302018-05-15T01:17:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ सोहळा मंगळवारी (दि.१५) मुख्य नाट्यगृहात दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे दीक्षांत मार्गदर्शन होणार आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ सोहळा मंगळवारी (दि.१५) मुख्य नाट्यगृहात दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे दीक्षांत मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे असतील, तर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.
विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल २०१७ आणि नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ च्या परीक्षांमध्ये पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. उद्याच्या दीक्षांत सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते केवळ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनाच पदवी प्रदान केली जाईल. एम. फिल आणि पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना परीक्षा भवन परिसरात उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पदवी मिळेल, असेही डॉ. नेटके यांनी स्पष्ट केले. मंगळवारच्या दीक्षांत सोहळ्यात एकूण १२ हजार ९२४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यात पीएचडी संशोधक २७१, एम.फिल १८ आणि पदव्युत्तरच्या ११,६३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ५२,९०९ पदवीधारकांच्या पदव्या त्यांनी शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये १६ मे नंतर मिळणार आहेत. या सोहळ्याला शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. नेटके यांनी केले आहे.