अध्यक्षपदाचा आज फैसला
By Admin | Published: March 20, 2017 11:36 PM2017-03-20T23:36:55+5:302017-03-20T23:38:01+5:30
जिल्हा परिषद : शिवसेना-राष्ट्रवादीत चुरसशिवसेना-कॉँग्रेस, माकपाची आघाडी
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची मंगळवारी (दि. २१) दुपारी निवडणूक होत असून, शिवसेना-कॉँग्रेस-माकपाचा घरोबा गेल्या काही दिवसांपासून कायम असून, शिवसेनेचा अध्यक्ष तर कॉँग्रेसचा उपाध्यक्ष होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, भाजपा व राष्ट्रवादीनेही आघाडी करीत वेगळी चूल मांडली असून, अध्यक्ष पदासाठी गेल्या दोन दिवसांपासून चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्याचे समजते. गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकत राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचे चित्र आहे. शनिवारी राष्ट्रवादी व भाजपाचे सदस्य पुढे मागे एकाच ठिकाणी सहलीला गेल्यानंतर भाजपा व राष्ट्रवादी आघाडी होणार हे जवळपास निश्चित होते. त्यानुसार सोमवारी (दि.२०) सायंंकाळपर्यंत भाजपा व राष्ट्रवादीचे सदस्य एकत्रितरीत्या पाथर्डी फाट्यावरील एका हॉटेलमध्ये पोहोचले. शिवसेनेच्या वतीने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, आमदार अनिल कदम यांनी मोर्चा सांभाळत सर्वच पक्षाच्या नेत्यांशी वरिष्ठ पातळीवरून चर्चा केल्याचे समजते. शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आले असून, शिवसेनेला एका अपक्षाने सेनेला पाठिंबा दिल्याने सेनेचे संख्याबळ २६ इतके झाले आहे.शिवसेनेसोबत कॉँग्रेसचे ८ व माकपच्या तीन सदस्यांसह एक अपक्ष असे चार मिळून हे संख्याबळ ३८ इतके झाल्याची चर्चा आहे. अध्यक्ष पदाच्या बहुमतासाठी ३७ इतके संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेचा अध्यक्ष तर कॉँग्रेसचा उपाध्यक्ष असे समीकरण तयार झाल्याचे समजते. तर भाजपा व राष्टवादी यांचे संख्याबळ ३५ इतके झाले आहे. जिल्हा परिषदेचे एकूण संख्याबळ ७३ इतके आहे. सोमवारी दिवसभर शिवसेना-माकप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी अशा चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. तर राष्ट्रवादी-भाजपा व माकपच्या नेत्यांच्याही चर्चा सुरू असल्याचे चित्र होते. माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांच्या अलंगुन गावी रविवारी रात्री उशिरा भाजपा व सेनेच्या मंत्र्यांनी हजेरी लावल्याचे कळते. तर आशेवाडी नजीक असलेल्या एका फॉर्म हाऊसवर भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
असे आहे संख्याबळ
जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ सदस्यांचे संख्याबळ पुढीलप्रमाणे-
शिवसेना- २५ (+ एक अपक्ष बंडखोर)
राष्ट्रवादी कॉँग्रेस- १८ ( + एक अपक्ष सहयोगी सदस्य)
भाजपा- १५( + एक अपक्ष सहयोगी सदस्य)
कॉँग्रेस- ०८
अपक्ष- ०४
माकप- ०३
एकूण- ७३ नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (दि. २१) दुपारी होत असून, अध्यक्षपदासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, तिकडे भाजपा व राष्ट्रवादीनेही आघाडीची मोट बांधत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात ही निवडणूक होणार आहे. सकाळी ११ ते १ दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज वितरण करणे, दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सभागृहात दाखल सदस्यांच्या स्वाक्षरी घेणे, १ वाजून १५ मिनिटांनी प्राप्त अर्जांची छाननी, दुपारी १.३० ते दुपारी १.४५ अर्ज माघारी घेणे आणि दुपारी १.४५ नंतर आवश्यक असल्यास मतदान घेणे असा निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सायंकाळी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, सहायक पोेलीस आयुक्त राजू भुजबळ आदिंनी नूतन प्रशासकीय इमारतीची पाहणी करीत निवडणुकीबाबत नियोजन केले.
अध्यक्षपदाचे दावेदार
शिवसेनेकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने नगरसूल गटातून सविता बाळासाहेब पवार,चास गटातून शीतल उदय सांगळे, राजापूर गटातून सुरेखा नरेंद्र दराडे, मुसळगाव गटातून वैशाली दीपक खुळे व कोहोर गटातून निवडून आलेल्या हेमलता श्याम गावित अध्यक्षपदाच्या नावांमध्ये चर्चेत आहेत. त्यात येवला किंवा सिन्नरमध्येच अध्यक्षपद जाण्याची चर्चा आहे. भाजपाकडून अध्यक्षपदासाठी धनश्री केदा अहेर, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मंदाकिनी दिलीप बनकर, अमृता वसंत पवार, किरण पंढरीनाथ थोरे यांची नावे चर्चेत आहेत.
उपाध्यक्षपदाचे दावेदार
उपाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसच्या आठपैकी तीन नावांवर चर्चा सुरू आहे. त्यात आमदार निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित, माजी आमदार अॅड. अनिलकुमार अहेर यांच्या कन्या अश्विनी अहेर तसेच माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांची नावे उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. भाजपाकडून डॉ. आत्माराम कुंभार्डे, समाधान हिरे, मनीषा पवार यांची, तर राष्ट्रवादीकडून यतिन पगार, डॉ. भारती पवार, संजय
बनकर, हिरामण खोसकर यांची नावे
चर्चेत आहेत. (प्रतिनिधी)