आजचे रुग्ण ‘लय भारी’; इंटरनेटवर शोधतात इलाज, थेट स्पेशालिस्ट रुग्णालयांची चढतात पायरी

By संतोष हिरेमठ | Published: May 20, 2023 08:22 PM2023-05-20T20:22:51+5:302023-05-20T20:24:03+5:30

इंटरनेट आणि काॅर्पोरेट रुग्णालयांच्या युगात शहरात आजही काही फॅमिली डाॅक्टर कार्यरत असून त्यांच्यावर रुग्णांचा विश्वास कायम आहे.

Today's patients 'so clever'; Seeking treatment on the Internet, they go directly to specialist hospitals | आजचे रुग्ण ‘लय भारी’; इंटरनेटवर शोधतात इलाज, थेट स्पेशालिस्ट रुग्णालयांची चढतात पायरी

आजचे रुग्ण ‘लय भारी’; इंटरनेटवर शोधतात इलाज, थेट स्पेशालिस्ट रुग्णालयांची चढतात पायरी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : दोन दशकांपूर्वी फॅमिली डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्ण स्पेशालिटी हाॅस्पिटलची पायरी चढत नव्हते. मात्र, आता आजारी पडले की, अनेक जण आधी लक्षणे कोणती, कोणता आजार आहे, कोणता उपचार लागेल, त्यासाठी कुठले रुग्णालय चांगले आहे, याचा इंटरनेटवर शोध घेतात. इंटरनेट आणि काॅर्पोरेट रुग्णालयांच्या युगात शहरात आजही काही फॅमिली डाॅक्टर कार्यरत असून त्यांच्यावर रुग्णांचा विश्वास कायम आहे.

दरवर्षी १९ मे रोजी जागतिक फॅमिली डाॅक्टर दिन पाळला जातो. फॅमिली डाॅक्टर म्हणजे हा कुटुंबाचा आधारवड मानला जातो. छोट्या-मोठ्या आजारांसाठी फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घेतला जात असे. अवघड विषयदेखील फॅमिली डाॅक्टरांपासून लपून राहत नसे. मोठ्या आजारांसाठी कुठे जायचे, हेही फॅमिली डाॅक्टरच ठरवीत असत. गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले. त्यामुळे फॅमिली डाॅक्टरांची संख्या कमी होत गेली.

शहरात किती फॅमिली डाॅक्टर्स?
शहरातील डाॅक्टरांची संख्या ही अडीच हजारांच्या घरात आहे. यामध्ये आजघडीला शहरात जवळपास ८० फॅमिली डाॅक्टर्स कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. हे बहुतांश डाॅक्टर्स वरिष्ठ आहेत.

फॅमिली डाॅक्टर्स घटले
फॅमिली डाॅक्टर्स हे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाशी जोडल्या गेलेले असतात. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीची माहिती त्यांना असते. गेल्या काही वर्षात फॅमिली डाॅक्टर्स कमी झाले आहे. परंतु आजही अनेक फॅमिली डाॅक्टर्स कार्यरत आहेत.
- डाॅ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन

फॅमिली मेडिसीन अभ्यासक्रम सुरू करावा
रुग्ण आता इंटरनेटवर विश्वास ठेवतात. डाॅक्टरांकडे जाण्याआधीच आजाराविषयी, उपचाराविषयी माहिती गोळा करतात. फॅमिली डाॅक्टर्सची संख्या वाढीसाठी ‘एमबीबीएस’नंतर दोन वर्षांचा फॅमिली मेडिसीन अभ्यासक्रम सुरू केला पाहिजे.
- डाॅ. कुलदीपसिंग राऊळ, माजी अध्यक्ष, आयएमए

Web Title: Today's patients 'so clever'; Seeking treatment on the Internet, they go directly to specialist hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.