स्कूलबसने चिमुकल्याला चिरडले; संतप्त जमावाने दगडफेक करत बस पेटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 07:56 PM2024-01-17T19:56:51+5:302024-01-17T19:58:06+5:30
पांगरा येथे शाळेच्या बसने चिमुकल्याला चिराडल्यानंतर संतप्त जमावाने बसवर दगडफेक करून पेटवून दिली.बसमधील १० ते १२ विद्यार्थी सुखरुप
चितेगाव (ता. पैठण) : आईसोबत रस्त्याने चालणाऱ्या एका पाचवर्षीय बालकाला स्कूलबसने चिराडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने स्कूलबसपेटवून दिल्याची घटना पैठण तालुक्यातील चितेगाव जवळील पांगरा गावात बुधवारी (दि. १७ ) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. हमजा शाहरूख शेख असे मयत बालकाचे नाव आहे.
इटखेडा येथील आग्रसेन विद्या मंदिर या शाळेची बस (एम.एच १५ एके १४४६) पांगरा येथील काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी गावात आली होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना सोडून परत जाताना रस्त्यालगत आईसोबत चालत जाणारा हमजा शाहरूख शेख (वय ५ वर्षे) हा चिमुकला बसच्या पुढील चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यानंतर चालकाने बस पुढे काही अंतरावर नेऊन उभी केली व तेथून पळ काढला. यावेळी चिमुकल्याच्या आईने हंबरडा फोडताच ग्रामस्थ जमा झाले.
संतप्त जमावाने बसवर तुफान दगडफेक केली. या बसमध्ये बिडकीन येथील दहा ते बारा विद्यार्थ्यांना काही ग्रामस्थांनी सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर घाबरलेल्या या विद्यार्थ्यांना बिडकीन येथील एका खाजगी रुग्णालयाच्या रूग्ण वाहिकेतून बिडकीन येथे सुखरूप पोचविण्यात आले. तोपर्यंत बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव हटवून मयत यास बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पोलिस घटनास्थळावरून जाताच अज्ञात व्यक्तींनी अपघातग्रस्त बस पेटवून दिली. याबाबत माहिती मिळताच पोलिस परत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील एका कंपनीतील अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण केले. अग्निशमन दलाचा बंद येईपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेचा पुढील तपास बिडकीन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे हे करीत आहेत.
दरम्यान, मयत हमजा शाहरूख शेख हा शाहरूख शेख यांचा मुलगा होता. त्याला एक बहीण आहे. शाहरूख शेख हे पांगरा रस्त्यावरील एक कंपनी समोर चहा टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेनंतर शेख यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे.