गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू; चाळीस तासांची झुंज ठरली अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 03:24 PM2023-08-27T15:24:25+5:302023-08-27T15:25:14+5:30
बापाचा हलगर्जीपणा बेतला मुलाच्या जीवावर, आईचा आक्रोश मन हेलावणारा...
जयेश निरपपळ
गंगापूर: (औरंगाबाद) शहरातील अहिल्यादेवी नगर येथे शुक्रवारी सायंकाळी घरात झालेल्या गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी(२७) रोजी सकाळी अकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्यन राहुल राठोड (वय अडीच वर्षे)असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी मृत मुलाचा बाप राहुल राठोड याच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील अहिल्यादेवीनगर येथे नवनाथ अंबादास भराड यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर बीड येथील दाम्पत्य राहुल कल्याण राठोड(२९)पत्नी संगीता व अडीच वर्षांच्या मुलगा आर्यनसह भाडेकरू म्हणून राहत होते. राहुल हा शहरातील कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता.
या घटनेत आर्यनच्या डोक्याच्या मधोमध गोळी लागली होती, त्यामुळे खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अत्यवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर घाटीतील अतिदक्षता विभागात आर्यनची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र त्याची चाळीस तासांची झुंज शेवटी अपयशी ठरली व चिमुकल्या आर्यने रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.
आईचा आक्रोश मन हेलावणारा
गोळीबार प्रकरणाला कारणीभूत असलेला आर्यनचा बाप राहुल पोलीस कोठडीत असल्याने आर्यनजवळ आई व इतर कुटुंबीय होते. दरम्यान रविवारी सकाळी आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देतात आर्यनच्या आई संगीता राठोड यांनी घाटी रुग्णालयात आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह उपस्थितांचे डोळे पानावले होते, आई संगीता यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.
आरोपी बापावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा
घटनेचा सूत्रधार मृत मुलाचा बाप राहुल कल्याण राठोड याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता . आरोपीस शनिवारी सायंकाळी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने राहुल राठोड यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान जखमी आर्यनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यांच्या कलमात वाढ केली असून आरोपी राहुल कल्याण राठोड याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल केल्या असल्याची माहिती पोनि सत्यजित ताईतवाले यांनी दिली. घटनेचा अधिक तपास पोउ दीपक आवटी हे करीत आहे.