शौचालय बांधकामाची पालिकेत लगीनघाई
By Admin | Published: April 15, 2017 11:46 PM2017-04-15T23:46:54+5:302017-04-15T23:48:18+5:30
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी जालना पालिकेला दिलेले उद्दिष्ट ३१ मार्च अखेर पूर्ण होऊ शकले नाही.
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी जालना पालिकेला दिलेले उद्दिष्ट ३१ मार्च अखेर पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे एप्रिल अखेर तरी उद्दिष्ट पूर्ण व्हावे म्हणून पालिकेत शौचालय बांधकाम संदर्भात एकच लगीनघाई सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान पालिका सांगत असलेला आकड्यातही मोठ तफावत असल्याचे दिसून येते.
शौचालयांची कामे गतीने करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. पालिकेकडून पाठपुरावा करण्यात येत असला तरी काही नागरिकांनी अनुदानाचे पैसे उचलूनही शौचालय बांधकाम केले नाही. त्यामुळे शहरातील १३ हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. मार्च अखेर सात हजार पेक्षा अधिक शौचालयांची कामे झाल्याचा पालिकेकडून होत असला तरी यातही मोठा घोळ आहे. अनेक कामे अर्धव असून, उद्दिष्टपूर्तीसाठी अर्धवट अथवा जुने बांधकाम नवीन दाखविण्यात आले आहे.
शहरातील बांधकामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गत दोन ते तीन महिन्यांपासून पालिका शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेत असली तरी अपेक्षित यश मिळविता आलेले नाही. परिणामी शहर हागणदारीमुक्त होते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता विभागासह कर विभागालाही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. कर विभागाने ५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, स्वच्छता सभापती मुजीब लोहार तसेच स्वच्छता विभागातील निरीक्षकांनी शौचालय बांधकाम आढावा तसेच शहरातील स्वच्छतेबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या. या बैठकीस विविध प्रभागातील नगरसेवकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)