टोलचा रोड ‘झक्कास’, सर्व्हिस रोड ‘भकास’; झाल्टा फाटा ते देवळाई सर्व्हिस रोडवर ‘खा धक्के’

By विकास राऊत | Published: November 28, 2022 12:50 PM2022-11-28T12:50:35+5:302022-11-28T13:11:58+5:30

पावसाळा संपल्यामुळे उखडलेल्या सर्व्हिस रोडचे काम एनएचएचआयने (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) हाती घेतले आहे, परंतु ते संथ गतीने सुरू आहे.

Toll Road 'Zakkas', Service Road 'Bhakas'; 'Kha dhakke' on service road of Zalta phata to Devlai NHIA | टोलचा रोड ‘झक्कास’, सर्व्हिस रोड ‘भकास’; झाल्टा फाटा ते देवळाई सर्व्हिस रोडवर ‘खा धक्के’

टोलचा रोड ‘झक्कास’, सर्व्हिस रोड ‘भकास’; झाल्टा फाटा ते देवळाई सर्व्हिस रोडवर ‘खा धक्के’

googlenewsNext

औरंगाबाद : सोलापूर ते औरंगाबादमार्गे धुळे (एनएच- २११) या राष्ट्रीय महामार्गालगत कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला सर्व्हिस रोड अवघ्या ११ महिन्यांत उखडला आहे. टोल असलेला रोड सध्या ‘झक्कास’ असला तरी शहरात, गावांकडे, शेतात जाण्यासाठी वाहनधारकांसाठी असलेला सर्व्हिस रोड ‘भकास’ झाला आहे.

पावसाळा संपल्यामुळे उखडलेल्या सर्व्हिस रोडचे काम एनएचएचआयने (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) हाती घेतले आहे, परंतु ते संथ गतीने सुरू आहे. उखडलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करीत सुमारे २ ते ४ किमी लांबून वळसा घालून यावे लागते. सायंकाळनंतर खड्डेयुक्त रस्त्यावरून जाताना वाहनधारकांची लुटमार होण्याच्या घटना वाढत आहेत. डागडुजीसाठी उखडून ठेवलेल्या रस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे.

झाल्टा फाटा ते देवळाई-साई टेकडी चौफुलीपर्यंत अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड खराब झाला आहे. रस्त्यावर दोन ते चार फुटांहून अधिक खड्डे पडले आहेत. पूर्ण रोड दोन्ही बाजूंनी खचला आहे. शिवाय मुख्य महामार्गावर देखील खड्डे पडले असून, त्यावर डांबरी पॅच मारले आहेत.

कंत्राटदाराकडे ४ वर्षे देखभाल दुरुस्ती
कंत्राटदाराकडे ४ वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असून, १३ कोटी रुपयांची ‘ईएमडी’ (सुरक्षा ठेव) ‘एनएचएआय’कडे आहे. सर्व्हिस रोड खराब झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर रोड पुन्हा खोदण्यात आला आहे. त्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराची १३ कोटींची ‘ईएमडी’ एनएचएआयकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

झाल्टा चौकातही चुकीचे अलायन्मेंट
‘एनएचएआय’ने महामार्ग बांधल्यानंतर जुना रस्ता बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला; परंतु बांधकाम विभागाने डागडुजी न केल्याने अंबिका हॉटेललगतच्या चौफुलीपासून निपाणीपर्यंत एनएचएआयने बांधलेल्या सर्व्हिस रोडवर सर्व प्रकारच्या वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला. सर्व्हिस रोड पूर्णत: खचला आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे मुरूम, खडीकरणासह केलेल्या डांबरी रस्त्याची चाळणी झाली. बायपासचे काम झाल्टा चौकापर्यंत पूर्ण झाले आहे, परंतु त्याचे अलायन्मेंट चुकले असून, जुना रस्ता चार फूट खाली गेला आहे.

औरंगाबाद हद्दीतील महामार्ग...
लांबी : ६० किमी
कंत्राटदार कंपनी : एल अँड टी, दिलीप बिल्डकॉन
अभियंता संस्था : सातारा इन्फ्रा, कन्सल्टिंग इंजि., सुगम टेक्नो.
प्रकल्पाचा खर्च : अंदाजे १ हजार कोटी
वाहतुकीला सुरुवात : डिसेंबर २०२१
 

Web Title: Toll Road 'Zakkas', Service Road 'Bhakas'; 'Kha dhakke' on service road of Zalta phata to Devlai NHIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.