तूर थप्पीलाच
By Admin | Published: April 29, 2017 11:21 PM2017-04-29T23:21:17+5:302017-04-29T23:22:12+5:30
बीड आतापर्यंत २ लाख ५९ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. मात्र, आणखी दीड लाख क्विंटल तूर थप्पीलाच आहे.
राजेश खराडे बीड
चार वर्षाच्या दुष्काळानंतर सरासरीएवढा पाऊस झाल्याने यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. परंतु हमी केंद्र उघडल्यानंतरही तूर विकताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. आतापर्यंत २ लाख ५९ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. मात्र, आणखी दीड लाख क्विंटल तूर थप्पीलाच आहे. जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर २२ मार्चपासून मापाविना एक लाख क्विंटल तूर पडून आहे, तर शेतकऱ्यांकडे ५० हजार क्विंटलचा साठा शिल्लक आहे. केंद्रावरील तूर खरेदी केली जाणार असल्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या असल्या तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र रखडलेलीच आहे.
जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर खरीपात तुरीची लागवड झाली होती. खरीप अंतिम टप्प्यात असतानाच अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी तुरीला मात्र याचा लाभ झाला. प्रतिकूल परिस्थितीत तुरीचे हेक्टरी साडेसात क्विंटलप्रमाणे उत्पादन झाले होते. हमीभावाच्या अनुषंगाने डिसेंबर अखेरीस १० कृउबा ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. बारदाण्याचा अनियमित पाणीपुरवठा व शासकीय गोदामातील अपुरी जागा यामुळे पाच ते सहा वेळा खरेदी केंदे्र बंद ठेवावी लागली होती. खरेदी केंद्राच्या सुरूवातीच्या काळात अधिकारी - कर्मचाऱ्यांशी संगनमत करून अधिकतर तूर व्यापाऱ्यांनी दाखल केल्याने शेतकरी वाऱ्यावर राहिले होते.
गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होतानाच १५ मार्च रोजी खरेदी केंद्रे बंद करण्याचे आदेश नाफेडच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडील शिलकीची तूर पाहता ही मुदत महिनाभराने वाढविण्यात आली होती. असे असताना देखील सध्या एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील १० खरेदी केंद्रावर मापाविना पडून आहे, तर जवळपास ५० हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांकडेच असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आठवडभरापासून दाखल झालेल्या तुरीची मापे देखील घेणे बंद झाले आहे. नाफेडकडून पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने मापे होत नसल्याचे खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.