कोरोना काळात ५० टक्के नागरिकांचे वाढले दातांचे दुखणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 03:16 PM2021-10-04T15:16:12+5:302021-10-04T15:16:34+5:30
दंत परिषदेत आधुनिक उपचारपद्धती आणि संशोधनावर विचारमंथन
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दंतोपचाराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ५० टक्के नागरिकांचे दातांचे दुखणे वाढले. वेळीच उपचार न घेतल्याने नैसर्गिक दात काढण्याची वेळ बहुतांश जणांवर ओढवत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शाळांमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सखोल दंत तपासणी होणे आवश्यक आहे, असे इंडियन इंडोडोटिक सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. विवेक हेगडे म्हणाले.
शहरातील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये रविवारी ‘डेंट ईलाईट २०२१’ या शिर्षकाखाली आंतरराष्ट्रीय दंत वैद्यकीय परिषद घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी डाॅ. हेगडे बोलत होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘सीएसएमएसएस’चे डाॅ. एस. सी भोयर, युनायटेड सिग्मा हाॅस्पिटलचे डाॅ. उन्मेष टाकळकर, दंततज्ज्ञ डाॅ. पी. डी. जैन, डाॅ. विवेक हेगडे, डाॅ. अजय लोगानी, डाॅ. संजय जैन, दंतशल्यचिकित्सक डाॅ. सदाशिव डावकर, डाॅ. मुजीब शेख, डाॅ. धनंजय घुनावत, डाॅ. प्रीतम शेलार आदी उपस्थित होते.
डाॅ. हेगडे म्हणाले, वेळीच उपचाराने दाताचे दुखणे बरे करता येते; परंतु नैसर्गिकरित्या दुसरा दात परत आणता येत नाही. मात्र, वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष झाल्याने अगदी कमी वयात कृत्रिम दात बसविण्याची नामुष्की ओढवते. शाळेत दंत तपासणी होते. फक्त तपासणी नको, तर सखोल तपासणीची गरज आहे. दंतोपचाराचे ९५ टक्के साहित्य आयात करावे लागते. त्यामुळे हे उपचार आजही महाग आहेत. भारतातही गुणवत्तापूर्ण उपचार साहित्याच्या निर्मितीची गरज असल्याचे डाॅ. हेगडे म्हणाले.
सॅटेलाईटच्या मदतीने दंतोपचार
डाॅ. संजय जैन म्हणाले, दंतोपचारात आधुनिक उपचार पद्धती येत आहेत. सॅटेलाईटच्या मदतीनेही दंतोपचार केला जातो. सॅटेलाईटच्या मदतीने इमेजेस पाहून अचूक निदान, उपचार करता येत आहे.