‘टॉप फाइव्ह’ मुलाखती पूर्ण; कुलगुरूपदी कोणाची निवड? राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष
By राम शिनगारे | Published: January 5, 2024 01:24 PM2024-01-05T13:24:01+5:302024-01-05T13:24:28+5:30
या मुलाखतीनंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या आदेशाची उच्चशिक्षण क्षेत्राला प्रतीक्षा लागली आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडीसाठी ‘टॉप फाइव्ह’च्या मुलाखती गुरुवारी (दि. ४) राजभवनात पार पडल्या. मुलाखतीला पाचही उमेदवार उपस्थित होते. या मुलाखतीनंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या आदेशाची उच्चशिक्षण क्षेत्राला प्रतीक्षा लागली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड करण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांची समिती स्थापन केली होती. या समितीने २४ जणांना २८ नाव्हेंबर २०२३ रोजी मुलाखतीसाठी बोलावले होते. त्यातून ‘टॉप फाइव्ह’ची शिफारस राज्यपालांकडे केली. त्यात कोल्हापूर विद्यापीठातील डॉ. विजय फुलारी, डॉ. ज्योती जाधव, पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढोले आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांचा समावेश होता. या पाच जणांना १९ डिसेंबर २०२३ रोजी मुलाखतीसाठी बोलावले होते. मात्र, त्या मुलाखती ऐनवेळी रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ४ जानेवारी रोजी मुलाखतीसाठी पाच जणांना बोलावले होते.
दुपारी ३ वाजता संबंधितांची रिपोर्टिंग राजभवनात होती. त्यानुसार ४ वाजेऐवजी साडेचार वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. सर्वच उमेदवारांना ८ ते १० मिनिटे देण्यात आली. त्यात सर्वाधिक वेळ डॉ. विजय फुलारी यांना देण्यात आल्याचे समजले. या मुलाखतीनंतर सर्व उमेदवार निघून गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत उमेदवारांची निवड करण्यात आलेली नव्हती. राज्यपालांकडून कुलगुरू निवडीच्या आदेशाची उच्च शिक्षणातील प्रत्येकाला प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगुरू निवडीचा आदेश येण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.