केंद्रीय प्राध्यापक भरतीचा विषय यूजीसीच्या अजेंड्यावर - भूषण पटवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:09 AM2019-09-15T05:09:10+5:302019-09-15T05:09:17+5:30
महाविद्यालयातील प्राध्यापकांची नेमणूक हा चिंतेचा विषय आहे. प्राध्यापक पदाचा लिलाव होत असेल, तर गुणवत्ता कशी सुधारणार ?
औरंगाबाद : महाविद्यालयातील प्राध्यापकांची नेमणूक हा चिंतेचा विषय आहे. प्राध्यापक पदाचा लिलाव होत असेल, तर गुणवत्ता कशी सुधारणार ? असा सवाल उपस्थित करीत केंद्रीय पद्धतीने किंवा इतर काही यंत्रणेची उभारणी करून प्राध्यापक भरती करण्याचा विषय विद्यापीठ अनुदान आयोगाने अजेंड्यावर घेतला आहे. याविषयी येत्या नोव्हेंबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला डॉ. पटवर्धन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या पातळीवर प्राध्यापक भरतीसंदर्भात सक्षम यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. याविषयीच्या प्राथमिक चर्चा करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी)विविध व्यासपीठांवर प्राध्यापक भरतीविषयी मंथन होत आहे. यातून येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या यूजीसीच्या महत्त्वाच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर घेण्यात येणार आहे.
राज्य आणि केंद्रीय पातळीवर भरती आयोग आहेत. त्यांच्या मार्फत प्राध्यापक भरती करायची की, स्वतंत्र शिक्षक भरती आयोग स्थापन करायचा, यावर विचार सुरू आहे. केंद्रीय पातळीवर कोणतेही धोरण ठरवताना अगोदर तीन-चार महिने चर्चा केली जाते. त्यावर विविध मते प्राप्त होतात. त्यानंतर प्रत्यक्ष धोरण राबविण्याचा विचार केला जातो. आता यूजीसीसह मंत्रालयीन स्तरावर प्राध्यापक भरतीविषयी चर्चा होत आहे.
हा विषय यूजीसीच्या अजेंड्यावर येईल. त्याचे लोकांनाही महत्त्व पटले आहे. खाजगीमध्ये बोलताना प्रत्येक जण यात लक्ष घालण्याची वेळ आली असल्याचे सांगतो. यूजीसी निधी देत असलेल्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणे सोपे जाईल. मात्र, राज्य विद्यापीठांसाठी यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आखून देईल, त्या तत्त्वांचे
पालन राज्य शासनालाही करावेच लागेल, कारण जनतेचा आणि
शिक्षण क्षेत्राचा दबाव असणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेविषयी लवकरच धोरण जाहीर केले जाईल, असेही डॉ. भूषण पटवर्धन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
>‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
>प्राध्यापक भरतीविषयी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची खूप चर्चा झाली. आमच्याकडेही काहींनी हा विषय मांडला. यातून चर्चा होत गेली. एखाद्या विषयाची चर्चा होत असेल तर त्याविरोधातील प्रतिक्रियाही
समजतात. मात्र, केंद्रीय प्राध्यापक भरतीला सर्वाधिक पाठिंबा असल्याचेही
डॉ. पटवर्धन म्हणाले.